मुख्याधिकाऱ्यांकडे व्यक्त केली नाराजी;दुकाने बंद करणार नाही पण टेस्ट करून घ्या:-नगराध्यक्षाच्या सूचना
मालवण दि प्रतिनिधी मालवणच्या व्यापाऱ्यांनी १५ जून पर्यंत कोरोना आरटीपीसीआर टेस्ट न केल्यास दुकाने,आस्थापने बंद करण्याचा इशारा मालवणच्या मुख्याधिकाऱ्यांनी दिल्यानंतर मुख्याधिकाऱ्यांच्या या आदेशाविरोधात आक्रमक बनलेल्या मालवणातील व्यापाऱ्यांनी नगरपालिका गाठत नेहमी व्यापाऱ्यानाच सक्ती का केली जाते ? टेस्ट न केल्यास दुकाने बंद करू ही जबरदस्ती योग्य नसल्याचे सांगत व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली दरम्यान, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी व्यापारी वर्गावर दुकान बंदची सक्ती प्रशासनाकडून होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ, मात्र व्यापाऱ्यांनी टेस्ट करून घेण्यावर भर द्यावा असे सांगितले मालवण नगरपालिकेच्या सभागृहात आज नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या उपस्थितीत व्यापारी वर्गाची बैठक झाली या बैठकीत नगराध्यक्ष महेश कांदळगावकर ,माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, उपनगराध्यक्ष राजन वराडकर, गटनेते गणेश कुशे, बांधकाम सभापती मंदार केणी, नगरसेवक दीपक पाटकर यांनी व्यापारी वर्गाची बाजू ऐकून घेतली. यावेळी कोरोना टेस्ट यापूर्वीही व्यापारी वर्गाने केल्या आहेत. आताही टेस्ट करायला आमचा विरोध नाही. मात्र प्रत्येक वेळी नियमांवर बोट ठेवून व्यापारी वर्गालाच का सक्ती केली जाते. टेस्ट न केल्यास दुकाने बंद करू या प्रशासनाच्या जबरदस्ती भूमिकेबाबत आमची नाराजी आहे. असे व्यापारी संघ अध्यक्ष उमेश नेरुरकर, नाना पारकर, विजू केनवडेकर, रवी तळाशीलकर, हर्षल बांदेकर, विनू पारकर, महेंद्र पारकर व अन्य व्यापारी प्रतिनिधी यांनी सांगत व्यापाऱ्यांची बाजू मांडली. शासनाच्या निकषानुसार कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जी नियमावली आहे त्यात आरटीपीसीआर टेस्ट व्यापाऱ्यांना बंधनकारक आहे. व्यापारी बांधव त्यांचे कुटुंब व ग्रहाक या सर्वांच्या दृष्टीने हे हिताचे आहे. काही व्यापाऱ्यांनी टेस्ट केलीही आहे. मात्र काही व्यापाऱ्यांना कोरोना होऊन गेला आहे, काहींनी लस घेतली, काहींनी काही दिवसांपूर्वी टेस्ट केली. यांनी पुन्हा टेस्ट करावी का याबाबत काही संभ्रम आहेत. पुन्हा पुन्हा व्यापाऱ्यांनीच टेस्ट करावी का ? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. या सर्वांवर निश्चित तोडगा काढू. मात्र काही कारणांनी काही व्यापारी वर्गाने टेस्ट केली नाही म्हणून त्यांचे दुकान बंद केले जाणार ही जबरदस्ती कोणावरही केली जाणार नाही. संबंधित व्यापारी वर्गाची बाजू ऐकून प्रसंगी मुदतवाढही दिली जाईल. अशी भूमिका नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर व उपस्थितांनी मांडली. कोरोना नियंत्रणात येऊन निर्बंध अधिक शिथिल झाल्यास मालवण शहरातील सर्व दुकाने खुली व्हावीत, यासाठी आपले प्रयत्न असल्याचे नगराध्यक्ष यांनी स्पष्ट केले. उपनगराध्यक्ष राजन वराडकर व गटनेते गणेश कुशे यांनी तर प्रशासन व्यापाऱ्यांवर जबरदस्ती करत असल्यास व्यापाऱ्यांच्या बाजूने रस्त्यावर उतरू अशी आक्रमक भूमिका मांडली. बैठकीला मुख्याधिकारी उपस्थित नसल्याबद्दल कुशे व वराडकर यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी आम्ही यापूर्वीही व्यापाऱ्यांच्या सोबत होतो व यापुढेही राहू, अशी ठाम भूमिका सुदेश आचरेकर यांनी स्पष्ट केली. अखेर सामज्यस्याने तोडगा काढत व्यापारी वर्गावर दुकान बंदची सक्ती प्रशासनाकडून होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ, मात्र व्यापाऱ्यांनी टेस्ट करून घेण्यावर भर द्यावा. असे नगराध्यक्ष यांच्या वतीने सांगण्यात आले. तसेच व्यापाऱ्यांनी थर्मल गन व ऑक्सिमिटर द्वारे बाजारपेठ येथील व्यापारी वर्गाची तपासणी करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी सूचना नगराध्यक्ष यांनी केली. त्याला व्यापारी वर्गाने सहमती दर्शवली. व्यापाऱ्यांचे लसीकरण व्हावे व्यापारी वर्गाचे लसीकरण करण्यासाठी नगरपालिकेने, आरोग्य विभागाने पुढाकार घ्यावा अशी सूचना व्यापारी संघ अध्यक्ष उमेश नेरुरकर व रवी तळाशीलकर यांनी मांडली. वादळ काळापासून लसीकरण प्रक्रिया संथगतीने सुरू आहे. त्यात गती आणून लोकसंख्येचा विचार करून अधिक लस साठा मालवण शहराला उपल्बध व्हावा. यासाठी जिल्हाधिकारी यांनी लक्ष द्यावे अशी आग्रही मागणी सुदेश आचरेकर यांनी या निमित्ताने केली. फ़ोटो : कोरोना आरटिपीसीआर टेस्ट सक्ती अन्यथा दुकाने बंद, या प्रशासन आदेशा विरोधात मालवण नगरपालिका येथे एकत्र आलेले व्यापारी प्रतिनिधी.
