व्यापाऱ्यांना विश्वासात घेवून नियोजन करा

कोरोना टेस्ट सक्तीवरुन उपनगराध्यक्ष वराडकर, गटनेते कुशे यांची सूचना; अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशारा

*💫मालवण दि.१२-:* कोरोना बाधित व्यक्ती सापडल्यास त्यांना विलगिकरण करून ठेवण्यास चांगल्या सोयीसुविधा अथवा विलगिकरण कक्ष तयार करण्याकडे मालवणचे मुख्याधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असताना व्यापारी, व्यावसायिक, भाजी विक्रेते, मच्छि विक्रेते, स्टॉलधारक व संकुलातील दुकानदार यांना कोरोना टेस्टची सक्ती मुख्याधिकाऱ्यांकडून का केली जात आहे ? फक्त व्यापाऱ्यांना वारंवार त्रास कशासाठी ? याबाबत मालवण नगरपालिका प्रशासनाने व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन सामोपचाराने मार्ग न काढल्यास व्यापाऱ्यांच्या बाजूने आपण रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा मालवणचे उपनगराध्यक्ष राजन वराडकर व गटनेते गणेश कुशे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे. मालवण नगरपालीकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी काल प्रसिद्धी पत्रक देऊन सर्व दुकानदार, व्यावसायिक, भाजी विक्रेते, मच्छि विक्रेते, स्टॉलधारकर, संकुलातील दुकानदार यांची आरटीपीसीआर टेस्ट करणे बंधनकारक असल्याचे सांगून न केल्यास सदरची आस्थापने बंद करण्यात येतील असे सांगितले आहे. मात्र, एखादी व्यक्ती पॉझिटिव्ह आल्यास विलगिकरण कक्षाच्या कोणत्या सुविधा आहेत. व्यापारी अगोदरच त्रस्त झालेले आहेत त्यातच दुकाने उघडी ठेवली म्हणून त्यांच्यावर मुख्याधिकारी दंडात्मक कारवाई करतात. एखाद्या दुकानात गल्लाही जमलेला नसतो त्याच्या कितीतरी जास्त पट दंड आकारून तो न भरल्यास दुकान बंद करण्याची धमकी देतात. यातून फक्त पैसे गोळा करणे एवढेच काम मुख्याधिकाऱ्यांना आहे का ? ज्या सुविधा नागरिकांना व व्यापाऱ्यांना दिल्या पाहिजेत त्या का दिल्या जात नाहीत त्याकडे लक्ष देण्यास मुख्याधिकाऱ्यांना वेळ नाही का ? असे सवाल राजन वराडकर व गणेश कुशे यांनी उपस्थित केले आहेत. जवळपास सात लाख पन्नास हजार रुपये एवढी दंड स्वरूपात जमा केलेली रक्कम नगरपालिकेकडे पडून आहे. परंतु त्यातून नागरिकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक असताना ती रक्कम बँकेत ठेवून व्याज घेण्यात मुख्याधिकारी धन्यता मानत आहेत. आणि हे काम ते यापूर्वी पासूनच करत आलेले आहेत असा आरोप वराडकर व कुशे यांनी केला आहे. व्यापारी मेटाकुटीला आले असताना त्यांना धीर देण्याचे सोडून मदतीचा हात देण्याचे सोडून वारंवार त्रास देणे योग्य आहे का ? व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करून यावर सामोपचाराने मार्ग काढावा त्यास व्यापारीही नक्कीच सहकार्य करतील अन्यथा व्यापाऱ्यांच्या बाजूने आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल असा इशाराही वराडकर व कुशे यांनी दिला आहे.

You cannot copy content of this page