पर्यावरणस्नेही सायकलपटू नितांतची घेतली युनिसेफने दखल

*💫कणकवली दि.०९-:* कणकवली तालुक्यातील वरवडे-फणसवाडी गावचा रहिवासी आणि एस. एम. हायस्कूलमध्ये दहावीत शिकत असलेल्या पर्यावरणस्नेही सायकलपटू नितांत राजन चव्हाण याची दखल मुलांसाठी काम करणारी जागतिक संघटना असलेल्या युनिसेफने घेतली असून ‘हिरवे जगू हिरवे जपू’ चा संदेश स्वकृतीतून देणाऱ्या नितांतवरील विशेष लेखाचा समावेश ‘चरखा युनिसेफ’ या प्रकल्पाच्या वेब पोर्टलवर ५ जून या जागतिक पर्यावरण दिनी प्रसिद्ध केला आहे. सायकल चालवण्यातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत बालपणापासून सायकलिंगची आवड जोपासलेल्या आणि एकाच दिवसात २०० कि. मी. सायकलिंग करणारा नितांत राजन चव्हाण हा चरखा युनिसेफच्या अभिकृत वेबपोर्टलवर स्थान मिळवलेला या वर्षीचा महाराष्ट्रातील एकमेव सायकलपटू विद्यार्थी आहे . इयत्ता सहावीत असताना राष्ट्रसेवादलने आयोजित केलेल्या मिरज-राधानगरी-फोंडा-कणकवली-मालवण-देवगड-वैभववाडी ते मिरज या सायकल रॅलीत सहभागी होऊन नितांतने पाच दिवसांत 480 कि. मी. चा सायकल प्रवास पूर्ण केला होता. ‘कणक रायडर्स’ सोबत त्याचा सायाकलिंगचा प्रवास सुरु असतो. स्वतः सोबतच आपल्या अनेक मित्र – मैत्रिणींना त्याने या सायकल वेडात सामील करून घेतलंय. तसेच तो NCC चा सिनिअर कॅडेट ही आहे. कणकवली ते पणजी – खारेपाटण – कणकवली असा 300 किमी चा सायकल प्रवासही त्याने 24 तासांत पूर्ण केला आहे. आपल्या सायकलिंगने तो पर्यावरण वाचवण्याचा, त्याचे संवर्धन करण्याचा संदेश देत असतो. नितांतच्या याच पर्यावरणस्नेही कामाची जागतिक पर्यावरण दिनी चरखा युनिसेफच्या प्रकल्पप्रमुख अलका गाडगीळ यांनी दखल घेतली आहे. राष्ट्रीय स्तरावरील कार्यरत असणाऱ्या ‘युथ की आवाज ‘या दिल्ली येथील संस्थेनेही ‘चरखा युनिसेफ’ या वेब पोर्टलवरील नितांतवरील लेख आपल्या अभिकृत वेबसाईटवरून प्रसिद्ध केला आहे. दै.लोकसत्ता नेही आपल्या ऑनलाइन साईटवर नितांत विशेष व्हिडीओ जागतिक पर्यावरणदिनी प्रसिद्ध केला आहे. तसेच दिल्ली येथे कार्यरत असणारे महाराष्ट्र राज्य शासनाचे प्रसिद्धी अधिकारी दयानंद कांबळे हेही नितांत चव्हाणच्या सायकलींगच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाच्या कामाची दखल घेऊन त्याच्यावरील विशेष लेख आपल्या ट्विटर हँडलवरून प्रसिद्ध करणार असल्याची माहिती चरखा युनिसेफच्या प्रकल्पप्रमुख अलका गाडगीळ यांनी दिली आहे. आपल्या सायकलींगच्या आवडीमुळे आणि पर्यावरणस्नेही कामामुळे युनिसेफने दखल घेतलेल्या नितांतचे जिल्ह्यातून सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

You cannot copy content of this page