अतुल बंगे यांचा आंदोलनाचा इशारा:ग्रामस्थ आक्रमक ; उपजिल्हाधिकारी यांना निवेदन..

⚡कुडाळ ता.१७-: केळुस येथील आकाश फिश मिल कंपनीमध्ये मासे वाहतूक करणाऱ्या वाहनांमधून दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर सांडत असल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरत आहे. यामुळे हुमरमळा, माड्याचीवाडी आणि आंदुर्ले परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून, नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित मासे वाहतूक कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या संदर्भात हुमरमळ्याचे सरपंच अमृत देसाई आणि माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. यापूर्वी कंपनी प्रशासनाला या समस्येबाबत कल्पना देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्याचे अतुल बंगे यांनी सांगितले.
मासे वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरत असून, नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे बंगे यांनी निवेदनाद्वारे स्पष्ट केले. कंपनी प्रशासनाने या वाहतुकीचा बंदोबस्त न केल्यास पंचक्रोशीतील नागरिकांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाकडून योग्य ती कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही दिली.
