संघटना बळकटीसाठी जिल्ह्यात तालुकानिहाय दौरे; सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा काँगेस बैठकीत निर्णय..

⚡ओरोस, ता. १७-: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ‘व्होट चोरी’च्या मुद्द्यावर जनजागृती करण्यासाठी तसेच काँग्रेस संघटनेला गावागावांत अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात चौपाल बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात दर आठवड्याला प्रभारींचे दौरे होणार असून, गावपातळीवर कार्यकर्त्यांशी संवाद साधून संघटनात्मक बांधणीला गती दिली जाणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक मंगळवारी सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा बँकेशेजारील शिक्षक पतपेढी सभागृहात पार पडली. लोकसभा प्रभारी शशांक बावचकर, जिल्हा प्रभारी हुस्नबानो खलिपे आणि कुडाळ विधानसभा प्रभारी गौस खतीब यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. यावेळी बैठकीला जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर, प्रदेश सरचिटणीस साईनाथ चव्हाण, माजी जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, विलास गावडे, प्रकाश जैतापकर, अॅड. दिलीप नार्वेकर, समीर वंजारी, महेश अंधारी, अॅड. मुल्ला, साक्षी वंजारी, सुगंधा साटम, राजेंद्र मसुरकर, विजय प्रभू, विधाता सावंत, बाळा धाऊसकर, चंद्रशेखर जोशी, रवींद्र म्हापसेकर, व्ही. के. सावंत, केतनकुमार गावडे, प्रवीण वरुणकर, प्रदीप मांजरेकर, अभय मालवणकर, अभय शिरसाठ, जेम्स फर्नांडिस, गुणाजी गवस, भालचंद्र जाधव, तौकीर शेख, किरण टेबूलकर, प्रवीण आचरेकर, अजिंक्य गावडे, सुभाष दळवी, अॅड. वैभव वेंगुर्लेकर, अमिदी सावंत, सोनल सावंत, सुमेधा सावंत, सुंदरवल्ली पडियाची, प्रीती बांदेकर, मधुकर लुडबे, महेंद्र मांजरेकर, आनंद पवार, चंद्रसेन सावंत, तबरेज शेख, महेश परब, आत्माराम सोकटे, प्रकाश डिचोलकर, महेश तेली, संजय लाड, संदीप सुकी, सुभाष सावंत, संदेश सुतार, आशिष भोगले, निलेश मालडकर, राज वर्देकर यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हा प्रभारी हुस्नबानो खलिपे म्हणाल्या, “आधी क्रांती झाली ती महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली आणि आता क्रांती होणार ती राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली. काँग्रेस कार्यकर्त्यांनी गावागावांत जाऊन लोकशाही आणि मतदारांच्या अधिकारांबाबत जनजागृती करावी. ‘व्होट चोरी’च्या मुद्द्यावर जनतेपर्यंत सत्य पोहोचविण्यासाठी चौपाल बैठका प्रभावीपणे घ्याव्यात.”, असे आवाहन केले. लोकसभा प्रभारी शशांक बावचकर यांनी, “लोकसभेचे चित्र पालटण्याचे काम काँग्रेसचा कार्यकर्ता करू शकतो. त्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने गावपातळीवर सक्रिय होऊन संघटनेची ताकद वाढविणे आवश्यक आहे. पक्षाचे विचार आणि भूमिका जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे.”, असे आवाहन केले.
या बैठकीत जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणीचा आढावा घेण्यात आला. प्रत्येक तालुक्यात प्रभारींचे दर आठवड्याला दौरे आयोजित करून कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्याचे निश्चित करण्यात आले. गावागावांत चौपाल बैठका घेऊन ‘व्होट चोरी’च्या मुद्द्यावर जनजागृती करण्याबरोबरच पक्षाचे संघटन मजबूत करण्यावर भर देण्यात येणार आहे. दरम्यान, गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार छाननी समितीवर (स्क्रुटिनींग कमिटी) निवड झाल्याबद्दल सतेज ऊर्फ बंटी पाटील यांचे अभिनंदन करणारा ठराव बैठकीत मांडण्यात आला. यावेळी नवनियुक्त सेल जिल्हाध्यक्ष तौकीर शेख (अल्पसंख्याक सेल), प्रवीण आचरेकर (ओबीसी सेल) आणि केतनकुमार गावडे (सोशल मीडिया सेल) यांचा सत्कार करण्यात आला. तसेच जिल्हा सरचिटणीस बाळा धाऊसकर यांच्यासह दोडामार्ग येथील ज्येष्ठ नेत्यांच्या मातोश्रींच्या निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
फोटो ओळ:- सिंधुदुर्गनगरी:
