अन्यथा उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार:हत्तींचा बंदोबस्त महिनाभरात करा; राजू मसुरकर यांचा वन विभागाला इशारा…

⚡सावंतवाडी ता.०८-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग व सावंतवाडी तालुक्यात गेल्या पाच वर्षांपासून रानटी हत्तींच्या कळपांचा वावर सुरू असून, या हत्तींकडून नागरिकांच्या जीवितासह शेती-बागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे या हत्तींचा तातडीने बंदोबस्त करून त्यांना शासकीय प्राणी संग्रहालय अथवा जामनगर येथील वनतारा प्रकल्पात स्थलांतरित करावे, अशी मागणी जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा जिल्हा काँग्रेस सरचिटणीस राजू मसुरकर यांनी वन विभागाच्या मुख्य सचिवांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
गेल्या काही वर्षांत हत्तींच्या हल्ल्यांमुळे नागरिकांचा मृत्यू झाला असून, अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवले आहे. हत्तींचा नागरी वस्तीत वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वारंवार निवेदने, आंदोलने व मागण्या करूनही वन विभागाकडून ठोस उपाययोजना झालेली नाही, असा आरोप मसुरकर यांनी केला आहे.
दोडामार्ग व सावंतवाडी तालुक्यातील विविध गावांमध्ये हत्तींच्या कळपांचा सातत्याने संचार सुरू असून, हत्तींच्या हालचाली पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. मात्र, केवळ हत्तींचे फोटो काढणे किंवा घटनांनंतर पाहणी करण्यापेक्षा नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता वन विभागाने एक महिन्याच्या आत हत्तींच्या कळपांचा बंदोबस्त करून त्यांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, अशी मागणी मसुरकर यांनी केली आहे. ही कार्यवाही न झाल्यास मुख्य सचिव, जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग व वन विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना कायदेशीर नोटीस बजावून उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL) दाखल करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
नागरिकांच्या जीविताचे संरक्षण करण्यासाठी वन विभागाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी राजू मसुरकर यांनी केली आहे.
