Headlines

आरोग्य, पैसा आणि वेळेची बचत करण्यासाठी मध्यस्थी हाच राजमार्ग…

कुडाळ न्यायालयात मध्यस्थी जनजागृती कार्यक्रम:नागरिकांना मध्यस्थी केंद्राचा लाभ घेण्याचे आवाहन..

⚡कुडाळ ता.०७-: वाढत्या न्यायालयीन प्रकरणांमध्ये तडजोडीने आणि जलदगतीने वाद मिटविण्यासाठी मध्यस्थी हा प्रभावी मार्ग असून, त्यातून आरोग्य, पैसा आणि वेळेची मोठी बचत होऊ शकते, असे प्रतिपादन कुडाळ दिवाणी न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष जी. ए. कुलकर्णी यांनी केले.
कुडाळ येथील दिवाणी न्यायालय तथा तालुका विधी सेवा समिती आणि कुडाळ तालुका बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने २०२६-२७ या वर्षातील दुसऱ्या टप्प्यातील ‘मेडिएशन अवेअरनेस प्रोग्रॅम’ ३ ऑक्टोबर रोजी कुडाळ दिवाणी न्यायालयात आयोजित करण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयाच्या मेन मेडिएशन सेंटर तसेच सिंधुदुर्ग जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, ओरोस यांच्या निर्देशानुसार झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान न्यायाधीश जी. ए. कुलकर्णी यांनी भूषविले.
प्रशिक्षित मध्यस्थी वकील व्ही. बी. मांडकुलकर यांनी नवोदित वकील तसेच पक्षकारांचे स्वागत करून ‘मध्यस्थी ही काळाची गरज’ आणि वाढत्या न्यायालयीन प्रकरणांवर मध्यस्थी हा प्रभावी पर्याय या विषयावर मार्गदर्शन केले. ग्रामीण भागातील विविध वादांची कारणे आणि त्यावर मध्यस्थीच्या माध्यमातून होणाऱ्या तडजोडीबाबत प्रशिक्षित मध्यस्थी वकील जे. एस. सामंत यांनी माहिती दिली. ‘मध्यस्थी : तडजोडीचा राजमार्ग’ या विषयावरही त्यांनी मार्गदर्शन केले.
कुडाळ तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष जी. टी. पडते यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षीय मार्गदर्शन करताना न्यायाधीश जी. ए. कुलकर्णी यांनी ‘एचएमटी’ घड्याळाचे उदाहरण देत एच म्हणजे हेल्थ, एम म्हणजे मनी आणि टी म्हणजे टाईम, असे सांगितले. मध्यस्थी केंद्राच्या माध्यमातून दिवाणी तसेच कायद्यानुसार मध्यस्थीस पात्र फौजदारी प्रकरणे तडजोडीने लवकर निकाली काढल्यास पक्षकारांचे आरोग्य, पैसा आणि वेळ वाचू शकतो. त्यामुळे नागरिकांनी मध्यस्थी केंद्राच्या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाला वकिलीचे शिक्षण घेणारे विद्यार्थी तसेच पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कनिष्ठ लिपिक एच. ए. कारेकर यांनी केले. वरिष्ठ लिपिक के. टी. कदम यांनी त्यांना सहकार्य केले.

You cannot copy content of this page