दीपक टी.व्ही.:बँक ऑफ इंडियाचा नेरूर माड्याचीवाडी येथे जनजागृती उपक्रम..

कुडाळ ता. वाढत्या फसवणुकीच्या आणि सायबर क्राईमच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांनी अधिक सतर्क आणि जागरूक राहणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन बँक ऑफ इंडियाचे अधिकारी दीपक टी. व्ही. यांनी केले.
बँक ऑफ इंडिया, कुडाळ शाखेच्या वतीने आर्थिक फसवणूक आणि सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती करण्यासाठी नेरूर माड्याचीवाडी येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन दीपक टी. व्ही. यांच्या हस्ते झाले.
यावेळी सरपंच विघ्नेश गावडे, मुख्याध्यापक विरजा साटेलकर, रोहित चव्हाण तसेच बचत गटातील महिला आणि ग्राहक उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना दीपक टी. व्ही. म्हणाले की, मोबाईलच्या माध्यमातून होणारी फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांनी वेळीच सावध होणे आवश्यक आहे. आजच्या डिजिटल युगात ‘जाणकार बना, सुरक्षित रहा’ या मंत्रानुसार प्रत्येकाने आर्थिक आणि डिजिटल व्यवहारांबाबत सजग राहून स्वतःला वित्तीयदृष्ट्या साक्षर केले पाहिजे. अनोळखी व्यक्तींकडून येणारे फोन, संदेश, लिंक किंवा आर्थिक व्यवहारांच्या मागण्यांना प्रतिसाद देताना विशेष काळजी घ्यावी, असे त्यांनी सांगितले.
शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि अटल पेन्शन योजना या सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाच्या योजना असून त्यांचा लाभ अधिकाधिक नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. या योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बँकेची टीम कार्यरत असल्याचेही त्यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात बँकेचा मोठा ग्राहकवर्ग असून ग्राहकांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती घेऊन त्यांचा लाभ घ्यावा. नव्या बँकिंग सुविधा आणि योजनांबाबतही ग्राहकांनी नियमित माहिती करून घ्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
उद्योजक, महिला बचत गट तसेच विविध व्यवसायांसाठी बँकेमार्फत उपलब्ध असलेल्या कर्ज योजनांची माहिती देताना त्यांनी कर्जाचा योग्य कारणासाठी वापर करून त्याची वेळेवर आणि प्रामाणिकपणे परतफेड केल्यास ग्राहक आणि बँक यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक दृढ होते, असे सांगितले.
कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना सायबर फसवणूक टाळण्याच्या उपाययोजना, वित्तीय साक्षरता, शासकीय योजना तसेच व्यवसायासाठी उपलब्ध असलेल्या बँकिंग सुविधांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
