साकेडी ता.कणकवली येथे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या उपस्थितीत वनराई बंधारा उभारणीसाठी श्रमदान

सिंधुदुर्ग (जिमाका), दि. ६ : पाण्याचे महत्त्व केवळ पुस्तकातून शिकण्यापेक्षा ते प्रत्यक्ष कृतीतून समजून घेणे अधिक प्रभावी ठरते. याच उद्देशाने कणकवली तालुक्यातील साकेडी येथे वनराई बंधारा उभारण्यात आला. साकेडी शाळा क्रमांक १ मधील विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे श्रमदान करत जलसंधारणाच्या कामात सहभाग घेतला. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून पाणी अडविणे, पाणी जिरविणे आणि जलस्रोतांचे संवर्धन याबाबत मार्गदर्शन केले.
वनराई बंधारा उभारणीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्व आणि जलसंधारणाची गरज प्रत्यक्ष अनुभवातून समजली. भविष्यातील पिढीने पाण्याचा वापर जपून करावा, पावसाचे पाणी वाया जाऊ न देता त्याचे संधारण करावे आणि गावातील जलस्रोतांचे संरक्षण करण्याची जबाबदारी स्वीकारावी, याबाबत यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. श्रमदानातून विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकीचे संस्कार रुजविण्याचा संदेशही देण्यात आला.
दुष्काळसदृश्य परिस्थितीत जलसंधारण ही केवळ प्रशासनाची जबाबदारी न राहता प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे लहान वयातच मुलांमध्ये जलसाक्षरतेची जाणीव निर्माण झाली, तर भविष्यात पाण्याचा सुयोग्य वापर आणि जलस्रोतांचे संवर्धन करणारी पिढी घडण्यास मदत होईल, असे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सांगितले. उपस्थित ग्रामस्थांनीही विद्यार्थ्यांसोबत श्रमदान करून जलसंधारणाच्या कामात लोकसहभागाचे महत्त्व अधोरेखित केले.
पालकमंत्री नितेश राणे यांच्या सुचनेनुसार जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात लोकसहभागातून दहा हजार वनराई बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यानुसार जिल्ह्यात वनराई बंधारे बांधण्याचे काम गतीने सुरू आहे. यावेळी सरपंच सुरेश साटम यांच्यासह ग्रामस्थ, साकेडी शाळा क्रमांक १ मधील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी उत्साहाने श्रमदान करत वनराई बंधारा उभारणीच्या कामात सहभाग घेतला. या श्रमदानात उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, गट विकास अधिकारी अरुण चव्हाण, तालुका कृषी अधिकारी प्रवीण ओहोळ, ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर, कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके यांनी सहभाग घेतला.
०००००
