Headlines

जाधववाडी नळपाणी योजना ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित

शुद्ध व शाश्वत पाणीपुरवठ्याला मिळणार चालना; जलतारा कार्यक्रमाचेही उद्घाटन

सिंधुदुर्ग (जिमाका), दि. २ : ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध, सुरक्षित आणि नियमित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ग्रामपंचायत आरोंदा, ता. सावंतवाडी येथील जाधववाडी नळपाणी योजनेचे ग्रामपंचायतीकडे हस्तांतरण जल अर्पण कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपाध्यक्ष दादा साईल यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. यावेळी दुष्काळसदृश्य परिस्थिती व पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलतारा कार्यक्रमाचेही उद्घाटन करण्यात आले.

यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत म्हणाले, जाधववाडी नळपाणी योजना ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित झाल्यामुळे ग्रामस्थांना शुद्ध व शाश्वत पाणीपुरवठा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. शुद्ध पाणी ही प्रत्येक नागरिकाची मूलभूत गरज असून सुरक्षित पाण्यामुळे पाण्यापासून होणाऱ्या विविध आजारांपासून नागरिकांचे संरक्षण होण्यास मदत होते. शुद्ध पाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्यमान सुधारण्यासोबतच जीवनमान उंचावण्यासही हातभार लागणार आहे. निरोगी ग्रामस्थ हे सक्षम गावाचे आधारस्तंभ असल्याचे त्यांनी सांगितले.

पाणीपुरवठा योजना उभारण्याबरोबरच त्यांची नियमित देखभाल, दुरुस्ती आणि योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. ग्रामस्थांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून पाण्याची बचत करावी तसेच नळपाणी योजनेची देखभाल व संरक्षण करण्यासाठी ग्रामपंचायतीला सहकार्य करावे, असे आवाहनही श्री. कामत यांनी केले.

जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल म्हणाले, ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला शुद्ध व सुरक्षित पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषद सातत्याने प्रयत्नशील आहे. पाणीपुरवठा ही केवळ सुविधा नसून नागरिकांच्या आरोग्याशी आणि जीवनमानाशी निगडित अत्यावश्यक बाब आहे. शुद्ध व शाश्वत पाणीपुरवठा करण्यासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध आहे. नागरिक निरोगी राहिल्यास त्यांची कार्यक्षमता वाढून कुटुंबाच्या आर्थिक उन्नतीसह गावाच्या विकासालाही चालना मिळते, असे त्यांनी नमूद केले.

ग्रामीण भागातील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध विकासकामे हाती घेण्यात येत आहेत. पाणीपुरवठा योजनांच्या माध्यमातून गावागावांतील नागरिकांना सुरक्षित आणि नियमित पाणी उपलब्ध करून देण्याला प्राधान्य दिले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी दुष्काळ निवारण आणि पाणीटंचाईवर मात करण्याच्या उद्देशाने जलतारा कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत आणि उपाध्यक्ष दादा साईल यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

कार्यक्रमास सावंतवाडी पंचायत समितीच्या सभापती सुक्ष्मिता जाधव, जिल्हा परिषद सदस्य सुधाकर कवठणकर, कार्यकारी अभियंता सुदेश राणे, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, गट विकास अधिकारी निलेश जाधव, पंचायत समिती सावंतवाडी, प्रशासक शुभदा कविटकर, ग्रामपंचायत आरोंदा यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी, अधिकारी-कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते आणि जाधववाडी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

००००००

You cannot copy content of this page