बांधकाम समिती सभेत सभापती महेंद्र चव्हाण यांचे आदेश
सिंधुदुर्गनगरी-: कुडाळ तालुक्यातील झाराप – माणगाव रस्त्याची दुरावस्था झाली आहे .या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर असूनही दुरुस्ती झालेली नाही. पावसाळ्यापूर्वी रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास या मार्गावरील वाहतूक बंद होणार आहे. तरी या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करा. असे आदेश बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांनी दिले. जिल्हा परिषद बांधकाम समितीची सभा सभापती महेंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आज ऑनलाईन संपन्न झाली. यावेळी जिल्हा परिषद बांधकाम कार्यकारी अभियंता तथा समिती सचिव अनामिका जाधव, सदस्य प्रदीप नारकर, मनस्वी घारे, राजेश कविटकर, आदींसह खातेप्रमुख अधिकारी सहभागी झाले होते. जिल्हा परिषद बांधकाम समितीच्या आजच्या सभेत सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी प्रधानमंत्री खनिकर्म योजनेअंतर्गत खनिकर्म निधीतून बारा रुग्णवाहिका उपलब्ध झाल्या आहेत. याबाबत सर्व सदस्यांनी समाधान करत जिल्हा परिषद पदाधिकार्यांसह पालक मंत्री, जिल्हाधिकारी,याच्या अभिनंदनाचा ठराव सभेत घेण्यात आला. कुडाळ तालुक्यातील झारप ते माणगाव रस्ता नादुरुस्त झाला असून वाहतुकीस धोकादायक बनला आहे. याकडे सदस्य राजेश कविटकर यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध असूनही अद्याप रस्त्याची दुरुस्ती झालेली नाही. याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. याची दखल घेत सभापती महेंद्र चव्हाण यांनी झाराप ते माणगाव हा रस्ता प्रमुख रस्ता असून या रस्त्यावरील वाहतूकही मोठी आहे. तरी पावसाळ्यापूर्वी या रस्त्याची डागडुजी न केल्यास वाहतूक बंद होणार आहे. तरी या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करा. असे आदेश बांधकाम विभागाला दिले. देवगड तालुक्यातील फणसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी रुग्णवाहिका उपलब्ध असली तरी सद्यस्थितीत या ठिकाणी असलेला वाहन चालक सेवानिवृत्त झाल्याने ही जागा रिक्त आहे. या ठिकाणी तात्काळ तात्पुरता वाहन चालक नियुक्त करावा. अशी मागणी सदस्य प्रदीप नारकर यांनी केली. तसेच जिल्ह्यात कोरोना चे रुग्ण वाढत असून काही ठिकाणी कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आले आहेत. मात्र त्या ठिकाणच्या रुग्णांना सेवा देण्यासाठी वैद्यकीय अधिकारी उपलब्ध होत नाहीत. तरी अशा ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांची प्रतिदिन व्हीजीट असावी. अशी सूचना प्रदीप नारकर यांनी केली.
