Headlines

योगशिक्षक शेखर बांदेकर यांना राज्यस्तरीय ‘योगरत्न गौरव पुरस्कार’…

⚡बांदा ता.०७-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेली आठ वर्षे निःशुल्क योगशिबिरे, योगवर्ग आणि योग जनजागृतीचे कार्य करणारे फिटनेस योग फाऊंडेशन, सिंधुदुर्गचे योगशिक्षक शेखर बांदेकर यांना त्यांच्या उल्लेखनीय योगसेवेबद्दल आविष्कार फाउंडेशन इंडिया यांच्या वतीने राज्यस्तरीय ‘योगरत्न गौरव पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.
शेखर बांदेकर हे जिल्ह्यातील विविध गावांमध्ये जाऊन सातत्याने योगशिबिरे व योगवर्ग घेत आहेत. कोणतेही शुल्क न घेता निःस्वार्थी भावनेने ते योगाचा प्रसार करत असून, ऑनलाइन तसेच ऑफलाइन माध्यमातून हजारो नागरिकांना योगाभ्यासाची गोडी लावण्याचे कार्य त्यांनी केले आहे. त्यांच्या या सातत्यपूर्ण आणि उल्लेखनीय योगसेवेची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
शिक्षक दिनाचे औचित्य साधून मालवण येथील स. का. पाटील महाविद्यालयात पुरस्कार वितरण सोहळा झाला. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. किसनराव कुराडे (कोल्हापूर) यांच्या हस्ते शेखर बांदेकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी प्रा. चंद्रशेखर कुशे, महाविद्यालयाचे प्राचार्य कैलास राबते, झिलू गोसावी, सौ. तेजस्विता वेंगुर्लेकर तसेच आविष्कार फाउंडेशनचे अध्यक्ष संजय पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
शेखर बांदेकर यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल बांदा, सावंतवाडी, कुडाळसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात तसेच महाराष्ट्रातील विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.
फोटो:-
मालवण येथे योग शिक्षक शेखर बांदेकर यांना पुरस्कार प्रदान करताना मान्यवर.

You cannot copy content of this page