Headlines

गॅस सिलिंडर बुकिंगची ४५ दिवसांची अट २५ दिवसांवर

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाजप युवा मोर्चाच्या पाठपुराव्याला यश; ग्राहकांना दिलासा

बांदा/सकाळ वृत्तसेवा
घरगुती एलपीजी गॅस सिलिंडर बुकिंगसाठी ग्रामीण भागातील ग्राहकांवर लागू असलेली ४५ दिवसांची कालमर्यादा कमी करून २५ दिवसांवर आणण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गॅस सिलिंडरची मागणी वाढत असताना झालेल्या या बदलामुळे ग्रामीण भागातील ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
गॅस सिलिंडर बुकिंगसाठी ४५ दिवसांची अट असल्याने विशेषतः एकाच सिलिंडरवर अवलंबून असलेल्या कुटुंबांची मोठी गैरसोय होत होती. श्रावण महिना तसेच आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घरगुती गॅसची मागणी वाढली असून, वेळेत सिलिंडर उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत होत्या. ग्रामीण व दुर्गम भागातील ग्राहकांना गॅस वितरण केंद्रांपर्यंत वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याने आर्थिक तसेच शारीरिक त्रास सहन करावा लागत होता.
या पार्श्वभूमीवर भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस जावेद खतीब यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून ४५ दिवसांची बुकिंग अट कमी करण्याची मागणी केली होती. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचेही या प्रश्नाकडे लक्ष वेधून त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. या पाठपुराव्यानंतर ग्रामीण वितरकांसाठी असलेले बुकिंगचे निर्बंध ४५ दिवसांवरून २५ दिवसांवर करण्यात आले आहेत.
काळाबाजारावर कारवाईची मागणी
४५ दिवसांच्या मर्यादेमुळे गॅस सिलिंडरचा काळाबाजार, अतिरिक्त दर आकारणी, कृत्रिम टंचाई आणि अनियमित वितरणाच्या तक्रारी वाढत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले होते. त्यामुळे गॅस वितरकांकडे पुरेसा साठा उपलब्ध ठेवावा, काळाबाजार व अतिरिक्त दर आकारणी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी तसेच ग्रामीण भागातील वितरण व्यवस्था अधिक प्रभावी करावी, अशी मागणीही करण्यात आली होती.
पावसाळ्यात पर्यायी इंधनाची उपलब्धता कमी असल्याने एलपीजी गॅस हा ग्रामीण भागातील कुटुंबांसाठी अत्यावश्यक घटक आहे. गणेशोत्सवाच्या काळात गॅसची मागणी आणखी वाढण्याची शक्यता असल्याने बुकिंगची कालमर्यादा कमी करण्याचा निर्णय ग्राहकांसाठी महत्त्वाचा ठरला आहे. दरम्यान, भाजप युवा मोर्चाच्या शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनाची अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वीकार करून दखल घेतली होती. यावेळी बांद्याचे माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राजाराम उर्फ बाळू सावंत, युवा मोर्चाचे मंडलाध्यक्ष सिद्धेश कांबळी, योगेश देसाई आदी उपस्थित होते.
गणेशोत्सवाच्या तोंडावर बुकिंगची मर्यादा २५ दिवसांवर आल्याने ग्रामीण भागातील ग्राहकांना वेळेत गॅस सिलिंडर मिळण्याचा मार्ग सुकर झाला असून, या निर्णयाचे ग्राहकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

You cannot copy content of this page