रेवंडी नदी पात्रातील भराव काढा

खा विनायक राऊत यांचे पाहणी दरम्यान आदेश

*💫मालवण दि.०३-:* रेवंडी येथील नदी खाडी पात्रातील कांदळवणाची तोड करून मातीची भर टाकून उभारण्यात आलेले अतिक्रमण काढून न टाकल्यास जलसमाधी घेण्याचा इशारा रेवंडी ग्रामस्थांनी दिल्याच्या पार्श्वभूमीवर आज खासदार विनायक राऊत यांनी प्रशासनाच्या अधिकाऱ्यां समवेत रेवंडी गावाला भेट देऊन त्या अनधिकृत भरावाची पाहणी केली. या पाहणी दरम्यान खासदार राऊत यांनी येत्या दोन दिवसात खाडीपात्रातील तो अनधिकृत भराव काढून टाकण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या आहेत. दरम्यान आज सायंकाळी या प्रकरणावरून काही जणांनी रेवंडी गावात जाऊन तक्रार करणाऱ्या ग्रामस्थाना धमकावल्याची चर्चा असून याबाबत मालवण पोलीस स्थानकात रात्री उशिरापर्यंत तक्रार दाखल झाली नव्हती. रेवंडी खाडीपात्राच्या किनारी कांदळवन तोडून जांभा दगड व माती टाकून मार्ग तयार केला जात असल्याने खाडीच्या पाण्याचा प्रवाह बदलून त्याचा फटका रेवंडी गावाला बसण्याची भीती आहे. याबाबत ग्रामपंचायतीने विरोध दर्शविला, प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली होती. शासकीय पंचनामे होऊन कांदळवन व बंधारा तोड झाल्याचे स्पष्टही होऊनही संबंधितांवर कारवाई होत नसल्याने महिन्याभरापूर्वी रेवंडी ग्रामस्थानी ग्रामस्थांनी चक्क खाडीपात्रात उतरून आंदोलन केले. त्यावेळी तहसीलदार अजय पाटणे यांनी कारवाईचे आश्वासन दिल्याने ग्रामस्थानी आंदोलन स्थगित केले होते. मात्र आश्वासन देऊन पाच महिने पूर्ण झाले तरी कोणतीही कारवाई न झाल्याने सरपंच सौ. प्रिया कांबळी यांनी पुन्हा एकदा तहसीलदारांचे लक्ष वेधत खाडीपात्रातील तो अनधिकृत भराव हटवावा अन्यथा रेवंडी ग्रामस्थ खाडीत जलसमाधी घेतील असा इशारा दिला होता या इशाऱ्यानंतर आज खासदार विनायक राऊत यांनी कुडाळच्या प्रांत वंदना खरमाळे यांच्यासह खनिकर्म अधिकारी पाटील, पोलीस निरीक्षक सोनू ओटवणेकर व इतर अधिकाऱ्यां समवेत भेट दिली व पाहणी केली. यावेळी खासदार राऊत यांनी दोन दिवसात खाडीपात्रातील तो अनधिकृत भराव प्रशासनाने हटवावा अश्या सूचना केल्या. दरम्यान महसूल प्रशासनाने खाडीपात्रातील तो अनधिकृत भराव त्वरित हटवावा अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल असे आदेश संबंधितांना दिल्याचे समजते. दरम्यान, रेवंडी खालची येथील नदी खाडीपात्रात टाकलेला भराव अनधिकृत ठरवून तो काढून टाकण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिल्याच्या रागातून संबंधित व्यक्तींनी रेवंडी गावात येऊन महिला व काही ग्रामस्थांना शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडल्याची चर्चा सुरू असून याबाबतची तक्रार रेवंडी मधील काही महिला व ग्रामस्थानी मालवण पोलीस स्थानकात दिल्याचे समजते याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याबाबत कार्यवाही सुरू होती.

You cannot copy content of this page