Headlines

लोककल्याण मेळाव्यातून कणकवलीकरांना विविध वित्तीय योजनांची माहिती…

पथविक्रेते, बचत गटातील महिला, युवक-युवतींसाठी मार्गदर्शन; दोन लाभार्थींना क्रेडिट कार्डचे वितरण..

⚡कणकवली ता.०२-: कणकवली नगरपंचायत, महिला व बाल कल्याण विभाग, DJAY-S आणि कनकसिंधू शहर स्तर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने कणकवली नगरवाचनालय हॉल येथे लोक कल्याण मेळावा व विशेष वित्तीय अर्थसहाय्य योजना मार्गदर्शक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात शहरातील पथविक्रेते, बचत गटातील महिला तसेच युवक-युवतींना शासनाच्या विविध आर्थिक व स्वयंरोजगार योजनांची माहिती देण्यात आली.

यावेळी व्यासपीठावर कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर, मुख्याधिकारी गौरी पाटील, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, प्रशासकीय अधिकारी नेहा तळेकर, सहाय्यक प्रकल्प अधिकारी अमोल भोगले, कृषी विभागाच्या दीपिका रावराणे, जिल्हा उद्योग केंद्राच्या सायली मेस्त्री, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या वर्षा कासले, महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचे सुरज बागवे, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाचे प्रसाद गावडे, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या स्नेहल पुजारे, परेश शिरसाठ तसेच कनकसिंधू शहर स्तर संघाच्या अध्यक्षा प्रिया सरूडकर व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना नगराध्यक्ष संदेश पारकर म्हणाले की, कणकवली शहरातील युवक-युवती तसेच पथविक्रेत्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि नगरपंचायतीच्या योजनांसोबतच शासन व विविध महामंडळांच्या योजनांची माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शासनाच्या अनेक योजना सर्वांसाठी उपलब्ध असल्या तरी माहितीअभावी त्यांचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे योजनांची माहिती आणि त्यांचा प्रचार-प्रसार होणे महत्त्वाचे आहे.

गेल्या सहा महिन्यांत दिव्यांग निधी व साहित्य वाटप, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरे, एकल महिला कार्यक्रम, व्यावसायिक प्रशिक्षण यासह विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. शहरातील महिलांसाठी लवकरच महिला समाज विकास भवन उभारण्यात येणार असून त्यातून महिलांचे आर्थिक व सामाजिक सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. याबाबतची आवश्यक कार्यवाही सुरू असून भविष्यातही अशा प्रकारचे मेळावे व उपक्रम आयोजित केले जातील, असे पारकर यांनी सांगितले.

मुख्याधिकारी गौरी पाटील म्हणाल्या की, शहरातील बचत गट, छोटे विक्रेते आणि पथविक्रेत्यांना विविध योजनांचा लाभ कसा घेता येईल, व्यवसायासाठी उपलब्ध असलेल्या संधी कोणत्या आहेत, कर्जासाठी अर्ज कसा करायचा, कर्जाची परतफेड कशी करायची तसेच CIBIL स्कोअरचे महत्त्व याबाबत माहिती मिळणे आवश्यक आहे. अशा कार्यक्रमांना उपस्थित राहिल्यास विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचते.

नगरपंचायतीमार्फत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजना (PM SVANidhi) राबविण्यात येत असून आतापर्यंत सुमारे ४८६ लाभार्थींना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. शासनाच्या योजनांकडे माहितीअभावी दुर्लक्ष होते. त्यामुळे नागरिकांनी उपलब्ध योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी कणकवली नगरपंचायतीमार्फत बचत गट, दिव्यांगांसाठी अनुदान वाटप तसेच विविध मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केले जात असून शहरातील सर्व घटकांचा सर्वांगीण विकास करण्यावर नगरपंचायतीचा भर असल्याचे सांगितले. उपस्थितांनी योजनांचा लाभ घेण्याबरोबरच इतर नागरिकांनाही त्याची माहिती द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

पथविक्रेत्यांसाठी कर्ज योजनांची माहिती

कार्यक्रमात पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेंतर्गत पथविक्रेत्यांना पहिल्या टप्प्यात १५ हजार रुपये, दुसऱ्या टप्प्यात २५ हजार रुपये आणि तिसऱ्या टप्प्यात ५० हजार रुपयांपर्यंत विनातारण खेळते भांडवली कर्ज उपलब्ध करून देण्यात येते, याची माहिती देण्यात आली. कर्जाची परतफेड करण्यासाठी एक, दोन व तीन वर्षांची मुदत असल्याचे सांगण्यात आले.

दुसरे कर्ज पूर्ण केलेल्या लाभार्थींना नव्याने सुरू करण्यात आलेल्या क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ मिळणार असून १० हजार ते ३० हजार रुपयांपर्यंतचे क्रेडिट कार्ड पाच वर्षांच्या मुदतीसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे.

स्वनिधी से समृद्धी कार्यक्रमांतर्गत प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जनधन योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना, वन नेशन वन रेशन कार्ड, बांधकाम कामगार नोंदणी, प्रधानमंत्री जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृवंदना योजना आणि आयुष्मान भारत योजना याबाबतही पथविक्रेत्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

विविध महामंडळांच्या योजनांची माहिती

जिल्हा उद्योग केंद्रामार्फत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP), तर कृषी विभागामार्फत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) यांची माहिती देण्यात आली.

तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ आणि महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. यामध्ये वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट प्रकल्प कर्ज व्याज परतावा योजना, २० टक्के बीज भांडवल योजना, एक लाख रुपयांपर्यंतची थेट कर्ज योजना आणि शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेचा समावेश आहे.

महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या दिव्यांग स्वावलंबन कर्ज योजना, हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणपूरक फिरत्या वाहनावरील दुकानासाठी कर्ज योजना तसेच वैयक्तिक थेट कर्ज योजनेबाबतही युवक, युवती, महिला आणि पथविक्रेत्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

दरम्यान, पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेंतर्गत नव्याने सुरू करण्यात आलेल्या क्रेडिट कार्ड योजनेतील दोन लाभार्थींना प्राथमिक स्वरूपात क्रेडिट कार्डचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सहाय्यक प्रकल्प अधिकारी अमोल भोगले यांनी मानले.

You cannot copy content of this page