पीक पाहणी नोंदणी पूर्वीप्रमाणे तलाठ्यांकडेच द्या; शिवसेनेचे तहसीलदारांना निवेदन..
⚡सावंतवाडी ता. ०२-: शासन स्तरावरून आंबा व काजू पिकांसाठी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली आहे. मात्र ही नुकसानभरपाई गणेश चतुर्थीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केली आहे. तसेच पीक पाहणी नोंदणीची प्रक्रिया पूर्वीप्रमाणे तलाठ्यांकडेच सोपवावी, अशी मागणीही करण्यात आली.
याबाबत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. शासनाने सध्या पीक पाहणी नोंदणीचे काम सुरू केले आहे. मात्र पीक पाहणी नोंदणी सहाय्यकांकडून शेतकऱ्यांची नोंदणी वेळेत होणे शक्य नसल्याने अनेक शेतकरी या प्रक्रियेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. एकदा पीक नोंदणीची मुदत संपल्यानंतर नोंदी करता येणार नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते.
त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन पीक पाहणी नोंदणीची जबाबदारी पूर्वीप्रमाणे तलाठ्यांकडेच देण्यात यावी, तसेच आंबा-काजू नुकसानभरपाई गणेश चतुर्थीपूर्वी वितरित करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन तहसीलदार श्रीधर पाटील यांनी शिष्टमंडळाला दिले.
यावेळी माजी शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख नारायण राणे, उपतालुकाप्रमुख गजानन नाटेकर, व्हीजेएनटी अध्यक्ष आनंद वरक, मागासवर्गीय सेलचे अध्यक्ष राजेश जाधव, तालुका संघटक संजय गावडे, विभागप्रमुख संजय माजगावकर, युवा तालुकाप्रमुख प्रशांत जाधव, सचिव विश्वास घाग, उपविभागप्रमुख संदेश सोनुर्लेकर, ओबीसी उपतालुकाप्रमुख लक्ष्मण भालेकर, सावंतवाडी उपतालुकाप्रमुख राकेश पवार, माजी नगरसेविका स्वप्ना नाटेकर, एकनाथ गावडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
