गणेशोत्सवापूर्वी आवश्यक उपाययोजनांची मागणी..
⚡कणकवली ता.३०-: तालुक्यातील तळेरे बसस्थानक परिसरातील ठिकठिकाणी पडलेले खड्डे तातडीने बुजवावेत तसेच प्रवाशांसाठी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, या मागणीसाठी पंचायत समिती सदस्य राजेश जाधव, तळेरेचे सरपंच हनुमंत तळेकर, उपसरपंच संदीप घाडी, वारगावचे उपसरपंच नाना शेट्ये, सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव आणि ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष वामन ताम्हणकर यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कणकवली विभागाचे स्थापत्य अभियंता अक्षय केकरे यांची भेट घेऊन निवेदन दिले.
तळेरे बसस्थानक परिसरात ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रवासी, ज्येष्ठ नागरिक तसेच अन्य नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. बसस्थानक परिसरातील आवश्यक सोयी-सुविधांकडेही तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याचे यावेळी निदर्शनास आणून देण्यात आले.
याबाबत ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष वामन ताम्हणकर यांनी यापूर्वीच संबंधित विभागाकडे मागणी केली होती. दिलेल्या मुदतीत मागण्यांची पूर्तता न झाल्यास ज्येष्ठ नागरिकांना लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
या पार्श्वभूमीवर पंचायत समिती सदस्य राजेश जाधव, सरपंच हनुमंत तळेकर, उपसरपंच संदीप घाडी, वारगावचे उपसरपंच नाना शेट्ये आणि सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव यांनी स्थापत्य अभियंता अक्षय केकरे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तळेरे दशक्रोशीतील विविध गावांमधून मोठ्या प्रमाणात प्रवाशांची ये-जा होणार असल्याने गणेशोत्सवापूर्वीच आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.
गणेशोत्सव काळात तळेरे दशक्रोशीतील गावांसाठी जादा एसटी गाड्या उपलब्ध करून द्याव्यात, हिरकणी कक्ष सुरू करावा तसेच बंद असलेला संपर्क क्रमांक तातडीने सुरू करावा, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. याशिवाय बसस्थानक परिसरातील खड्डे बुजवून प्रवाशांसाठी आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचीही मागणी करण्यात आली.
मागण्यांची दखल न घेतल्यास आणि ज्येष्ठ नागरिकांना लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागल्यास त्या आंदोलनात आपणही सहभागी होणार असल्याचे उपस्थितांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या मागण्यांबाबत विभागीय नियंत्रक दीपक घोडे यांच्याशी चर्चा करून पुढील आवश्यक कार्यवाही निश्चित करण्यात येईल, असे आश्वासन स्थापत्य अभियंता अक्षय केकरे यांनी दिले. गणेशोत्सवापूर्वी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या दृष्टीने कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तळेरे बसस्थानकातील खड्डे, मूलभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था आणि प्रवाशांच्या सोयी-सुविधांबाबत करण्यात आलेल्या मागण्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होणार, याकडे आता तळेरे दशक्रोशीतील प्रवाशांचे लक्ष लागले आहे.
