Headlines

पुस्तके वाचणे ही जीवनातील एक इनवेस्टमेंट..

गोपुरीतील वाचन संस्कृती उपक्रमाच्या शुभारंभ कार्यक्रमात वाचनप्रेमींचे मत..

कणकवली : पुस्तके वाचणे ही जीवनातील एक इनवेस्टमेंट आहे. पुस्तके वाचल्याने माणसांच्या विचारांना गती प्राप्त होते. वाचनामुळे खरे व खोटे काय याची समज माणसाला येते. आधुनिक काळात लोप पावत चाललेली वाचन संस्कृतीला पुन्हा उर्जिताव्यस्था प्राप्त करून देण्यासाठी वाचनप्रेमींनी तरुण पिढीला पुस्तके वाचण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे. त्यासाठी सर्वप्रथम पालकांनी स्वत: पुस्तके वाचण्याची सवय लावून पाल्यांना पुस्तके वाचण्याची गोडी लावली पाहिजे, अशी अपेक्षा वाचनप्रेमींनी व्यक्त केली.
गोपुरी आश्रम व अनुभव शिक्षण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने गोपुरी येथे वाचन संस्कृतीचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. याचा शुभारंभ कवियत्री सरिता पवार, मनीषा पाटील, गोपुरीचे सचिव विनायक उर्फ बाळू मेस्त्री यांच्यासह वाचनप्रेमींच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी यज्ञेश पोकळे, सिद्धी परब, जान्हवी रावण, सानवी भालेकर, काशिनाथ वर्देकर, यष्टा कदम, आर्यन तांबे, नतशा हिंदळेकर, सिद्धी वरवडेकर, कुणाल पाटणकर, रुपाली कदम आदी उपस्थित होते.
सिद्धी वरवडेकर म्हणाली, महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना आम्ही युवक-युवतींनी मिळून प्रा. राजेंद्र मुंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली गोपुरी आश्रमात वाचन संस्कृती हा उपक्रम सुरू केला होता. मात्र, काही कारणास्तव या उपक्रमाला ब्रेक लागला. आता पुन्हा नव्या उमेदीने हा उपक्रम सुरू करीत आहोत. या उपक्रमात वाचनप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहन तिने केले. कशिनाथ वर्देकर यांनी आपण पुस्तके वाचण्याचा निर्धार केला असून यापुढील काळात अधिकाधिक पुस्तके मी वाचणार असून माझ्यासोबत अन्य युवक-युवतींना पुस्तके वाचण्यासाठी प्रवृत्त करणार असल्याचे त्याने सांगितले. मानवी जीवनात पुस्तकांचे महत्त्व काय आहे, हे नताश हिंदळेकर हिने उपस्थितांना समजून सांगितले. मनीषा पाटील यांनी ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लावावी यासाठी आपण कॉलेजमध्ये वाचन कट्टा हा उपक्रम सुरु केल्याचे सांगितले. गोपुरी आश्रम व अनुभव केंद्राच्या वाचन संस्कृती उपक्रमाला सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली. सरिता पवार म्हणाल्या, वाचनामुळे माणसांचे विचार प्रगल्भ होतात. मात्र, अलीकडच्या काळात मोबाईलमुळे वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे, हे चित्र खेदजनक आहे. हे चित्र बदलण्यासाठी आणि युवा पिढीला वाचन संस्कृतीकडे वळविण्यासाठी वाचनप्रेमींनी पुढाकार घेतला पाहिजे. तसेच तरुण पिढीने मोबाईलमध्ये जास्त गुंतून न जाता पुस्तके वाचली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. उपस्थित वाचनप्रेमींनी वाचन संस्कृतीला उर्जिताव्यस्था प्राप्त करून देण्यासाठी कोणत्या नवीन संकल्पना राबवाव्यात यावर चर्चा केली. तसेच वाचन संस्कृती या उपक्रमाला नवीन वाचक जोडण्याचा निर्धार केला. त्यानंतर तेजे सिसोदीया दिग्दर्शित नसीरुद्दीन शहा यांचा इडस् ओन्ली ४७ डिग्री सेल्सिअर हा लघुपट दाखविण्यात आला. दरम्यान, वाचा विचार करा, जोडा आणि घडवा अशी टॅगलाईन देऊन दर महिन्याच्या एका रविवारी वाचन संस्कृती या वाचन आणि संवादाची वाटचाल या उपक्रमामुळे सुरू झाली आहे. वाचनाची आवड जोपासणे, विचारांची देवाणघेवाण घडविणे, उत्तम साहित्य सर्वांपर्यंत पोहोचवणे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
फोटो

You cannot copy content of this page