Headlines

ग्रामीण भागातून शिक्षण घेत डॉ. विठ्ठल शिंदे यांची इंग्रजी विषयातून पीएच.डी.ला गवसणी…

गोठोसच्या सुपुत्राचे शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश..

⚡सावंतवाडी ता.३०-:
येथील गोठोस, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग येथील रहिवासी आणि सध्या कोल्हापूर येथील वरिष्ठ महाविद्यालयात तासिका तत्त्वावर प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले डॉ. विठ्ठल गंगाराम शिंदे यांनी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथून इंग्रजी विषयातून पीएच.डी. पदवी संपादन केली आहे. अत्यंत सर्वसामान्य परिस्थितीतून अविरत परिश्रम, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी मिळविलेले हे यश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.

डॉ. शिंदे यांनी शिवाजी विद्यापीठाच्या इंग्रजी विभागातून “The Novels of Ruth Rendell: A Study in Mystery Fiction” या विषयावर पीएच.डी.चे संशोधन पूर्ण केले. त्यांच्या प्रबंधाचे मार्गदर्शन प्रा. डॉ. अद्वैत डी. जोशी यांनी केले आहे.

डॉ. विठ्ठल शिंदे यांचे प्राथमिक शिक्षण गोठोस या ग्रामीण भागात झाले. त्यानंतर त्यांनी वाडोस हायस्कूल येथे माध्यमिक शिक्षण, माणगाव कॉलेज येथे उच्च माध्यमिक शिक्षण, तर रत्नागिरी येथे बी.एड.चे शिक्षण पूर्ण केले. शिक्षण घेत असतानाच त्यांनी आपल्या ध्येयासाठी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले. बी.एड. व SET-NET परीक्षा उत्तीर्ण करून त्यांनी अध्यापन क्षेत्रात आपली कारकीर्द सुरू केली.

गोवा विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, KBP युनिव्हर्सिटी तसेच कोल्हापूर विद्यापीठात त्यांनी तासिका तत्त्वावर प्राध्यापक म्हणून काम केले असून, सध्या कोल्हापूर येथील वरिष्ठ महाविद्यालयात तासिका तत्त्वावर प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. अध्यापनासोबतच संशोधनाची आवड जोपासत त्यांनी पीएच.डी.चे आव्हान यशस्वीपणे पूर्ण केले.

ग्रामीण भागातील प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेत जिद्द, सातत्य आणि अथक परिश्रमांच्या बळावर पीएच.डी.पर्यंत मजल मारणारे डॉ. विठ्ठल गंगाराम शिंदे यांचे हे यश गोठोससह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

You cannot copy content of this page