प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कणकवलीसह जिल्ह्यातील प्रमुख बसस्थानकांवर पोलीस बंदोबस्ताची गरज
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख बसस्थानकांवर बंद असलेले पोलीस मदत कक्ष पुन्हा सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. जिल्ह्यातील बसस्थानकांवर दररोज मोठ्या संख्येने महिला, महाविद्यालयीन विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच ग्रामीण भागातील प्रवाशांची वर्दळ असते. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बसस्थानकांवर पोलीस मदत केंद्र अथवा पोलीस कक्ष कार्यरत असणे आवश्यक आहे.
कणकवलीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अन्य काही बसस्थानकांवरही पुरेशा प्रमाणात पोलीस बंदोबस्त किंवा होमगार्डची नियुक्ती नसल्याचे चित्र आहे. बसस्थानक परिसरात प्रवाशांना कोणतीही अडचण निर्माण झाल्यास अथवा अनुचित प्रकार घडल्यास तातडीने पोलिसांची मदत मिळणे गरजेचे असते. मात्र, पोलीस मदत कक्ष बंद असल्याने प्रवाशांना तक्रार किंवा मदतीसाठी संबंधित पोलीस ठाण्याशी संपर्क करून पोलिसांची वाट पहावी लागते.
बसस्थानक हे सार्वजनिक वाहतुकीचे महत्त्वाचे केंद्र असल्याने येथे सुरक्षिततेसाठी स्वतंत्र व्यवस्था असणे आवश्यक आहे. विशेषतः महिला आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बसस्थानक परिसरात पोलीस कर्मचारी किंवा होमगार्डची नियमित नियुक्ती करण्याची गरज आहे.
पालकमंत्र्यांच्या सूचनेची अंमलबजावणी अपेक्षित
कणकवली बसस्थानकातील बस लोकार्पण सोहळ्यावेळी पुण्यात घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितेश राणे यांनी पोलीस मदत केंद्र अथवा कक्ष सुरू करण्याबाबत सूचना करून लवकरच बंद असलेले पोलीस कक्ष सुरू होतील असे सांगितले होत. मात्र, अद्याप या सूचनेची प्रभावी अंमलबजावणी झालेली दिसत नाही. त्यामुळे केवळ कणकवलीच नव्हे, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख बसस्थानकांच्या सुरक्षेचा आढावा घेऊन आवश्यक त्या ठिकाणी पोलीस मदत कक्ष सुरू करावेत, अशी मागणी होत आहे. जिल्ह्यातील बस स्थानकांवर नियमित पोलीस बंदोबस्त, होमगार्डची नियुक्ती आणि स्वतंत्र पोलीस मदत कक्ष उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.
