शाश्वत शेतीसाठी अभिनव उपक्रम:पारंपरिक बियाण्यांच्या संवर्धनावर भर..
⚡कणकवली ता.३०-: तालुक्यातील मुक्ताई संकुल, वागदे येथे मुक्ताई शेती संशोधन व विकास गटाच्या माध्यमातून स्थानिक बियाणे बँक या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ शनिवारी करण्यात आला. स्थानिक व पारंपरिक बियाण्यांचे जतन, संवर्धन व पुनर्वापर व्हावा तसेच शेतकऱ्यांना दर्जेदार स्थानिक बियाणे उपलब्ध व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
शाश्वत शेतीला चालना देतानाच स्थानिक बियाण्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अधिक सक्षम व स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जाणार आहे. पारंपरिक वाणांचे संवर्धन झाल्यास स्थानिक जैवविविधता टिकविण्यासह भविष्यातील पिढ्यांसाठीही ही बियाणे उपलब्ध राहण्यास मदत होणार आहे.
या शुभारंभप्रसंगी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, जिल्हा परिषद सदस्य शीतल दळवी, पंचायत समिती सदस्य अक्षता राणे, वागदे सरपंच संदीप सावंत, प्रकल्प अधिकारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
जिल्हा परिषद उपाध्यक्ष म्हणून दादा साईल प्रथमच वागदे गावात आले. यावेळी वागदे ग्रामस्थांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
या प्रकल्पासाठी द एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट (TERI), नवी दिल्ली यांचे सहकार्य लाभले असून, बायफ इंटरनॅशनल रिसर्च फाउंडेशन, पुणे यांच्या माध्यमातून प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. स्थानिक बियाणे जतन करून शेतकरी अधिक समृद्ध व स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
