आयडियल हायस्कूल ते बिडवडी हायस्कूलपर्यंत दीडशे विद्यार्थ्यांचा सहभाग..
⚡कणकवली ता.३०-: ज्ञानदा शिक्षण संस्था आयडियल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज तसेच सावली जनसेवा शिक्षण संस्था, वरवडे यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून ‘मॅरेथॉन रन २०२६’चे आयोजन करण्यात आले. या मॅरेथॉनमध्ये सुमारे दीडशे विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
आरोडे येथील आयडियल हायस्कूलपासून मॅरेथॉनला सुरुवात करण्यात आली. तेथून बिडवडी हायस्कूलपर्यंत हा धावण्याचा उपक्रम घेण्यात आला. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेत क्रीडाविषयक आवड आणि शारीरिक तंदुरुस्तीचा संदेश दिला.
राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी, नियमित व्यायाम व शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व पटावे, या उद्देशाने या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. मॅरेथॉनदरम्यान विद्यार्थ्यांचा उत्साह पाहायला मिळाला.
या कार्यक्रमाला दयानंद शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष मोहन सावंत, कार्याध्यक्ष बुलंद पटेल, सावली जनसेवा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रसाद देसाई, उपाध्यक्ष संतोष पुजारे, मुख्याध्यापिका अर्चना देसाई यांच्यासह नायर मॅडम, बांदल मॅडम, खटावकर मॅडम, वर्धम मॅडम तसेच क्रीडाशिक्षक योगेश सामंत उपस्थित होते.
शैक्षणिक उपक्रमांसोबतच विद्यार्थ्यांच्या शारीरिक व क्रीडा विकासाला चालना देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. दीडशे विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे ‘मॅरेथॉन रन २०२६’ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
