Headlines

खड्डेमय रस्त्याचे रील बनवून वैभव नाईकांनी केली स्वतःचीच पोलखोल

शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे यांची टीका

मालवण (प्रतिनिधी)

माजी आमदार वैभव नाईक हे खड्डेमय रस्त्यांचे व्हिडीओ पोस्ट करून स्वतःचाच अपयशी कारभार मांडत आहेत. दहा वर्षे आमदार राहून देखील अपयशी आणि टक्केवारी कारभारामुळे मालवण कुडाळ मधील अनेक रस्ते पूर्णपणे नादुरुस्त झाले आहेत, तर आमदार निलेश राणे यांनी २२ महिन्याच्या आमदारकीच्या काळात मालवण कुडाळ साठी कोट्यावधी रुपयांचा निधी आणला आहे, याचाच पोटशूळ उठल्याने वैभव नाईक रिल्स बनवत आहेत, नाईक यांनी रस्त्यांची काळजी करू नये, त्यांनी रिल्स बनवून स्वतःची पोलखोल करत राहावी, अशी उपरोधिक टीका शिवसेना मालवण तालुकाप्रमुख मंदार लुडबे यांनी पत्रकार परिषदेत केली.

मालवण येथील महायुती आम. निलेश राणे संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी तालुकाप्रमुख मंदार लुडबे, मालवण नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकरब, नगरसेवक महेश कांदळगावकर, शिवाजी केळूसकर, गणेश परब आदी व इतर उपस्थित होते.

यावेळी मंदार लुडबे म्हणाले, स्वतः दहा वर्षे आमदार असताना मालवण तालुक्यातील रस्ते नादुरुस्त झाल्याचा व्हिडिओ दाखवत माजी आमदार वैभव नाईक स्वतःचीच पोलखोल करत आहेत. हे रस्ते स्वतःच्या व विनायक राऊत यांच्या कार्यकाळातील आहेत हे नाईक यांना कळत नाही. दोघेही निष्क्रिय म्हणून आता घरी बसले आहेत आणि व्हिडीओ पोस्ट करून आपले अपयश जनतेला दाखवत आहेत. राऊत जनतेला छळतात, तर नाईक जनतेला फसवतात, अशी या दोघांची स्थिती आहे, अशी टीका मंदार लुडबे यांनी केली.

याउलट आमदार निलेश राणे यांचा आमदारकीचा कार्यकाळ दोन वर्षे पण पूर्ण झाला नाही. मात्र त्या काळात आम. निलेश राणे यांनी मालवण कुडाळ मधील विविध विकास कामांसाठी सरकार कडून कोट्यावधी रुपयांचा निधी आणला. तसेच जिल्हा नियोजन मधूनही निधी आणला. या निधीतून रस्ते व इतर विकासकामे दिवाळीनंतर सुरु होणार आहेत. माजी आमदार नाईक यांनी अपयशी कार्यकाळात काहीच न केल्यामुळे जे रस्ते नादुरुस्त आहेत ते जनतेच्या हिताच्या दृष्टीने पूर्ण करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरु आहे. पावसाळी कालावधी असल्यामुळे काही वेळ लागेल. मात्र आमदार निलेश राणे हे रस्ते शंभर टक्के दुरुस्त करणार हा जनतेचा विश्वास आहे, मालवण मधील रस्ते वर्षभरात पूर्ण होतील, असे मंदार लुडबे यांनी यावेळी सांगितले.

आम्ही रिल्स बनवल्यास नाईक यांना महागात पडेल – दीपक पाटकर

यावेळी उपनगराध्यक्ष दीपक पाटकर म्हणाले, वैभव नाईक हे खोटे व्हिडीओ बनवून आमदार निलेश राणे यांच्यावर आरोप करत आहेत. रस्ते नादुरुस्तीबाबत दहा वर्षे आमदार राहिलेल्यानी २२ महिने आमदार राहिलेल्याना विचारावे हे संयुक्तिक नाही. आमदार निलेश राणे यांनी आणलेला कोट्यावधीचा निधी बोचत असल्याने नाईक यांची झोप उडाली आहे. वैभव नाईक यांनी यापुढे रिल्स बनवताना दहा वेळा विचारा करावा अन्यथा रिल्स आम्हालाही बनवता येतात, आम्ही रिल्स बनवल्यास नाईक यांना महागात पडेल, असा इशारा दीपक पाटकर यांनी दिला.

You cannot copy content of this page