पं.स. सदस्य दिपक सुर्वे यांनी मानले आभार
मालवण दि प्रतिनिधी
चिंदर गावात वारंवार उद्भवणाऱ्या वीज समस्यांवर आता कायमस्वरूपी तोडगा निघण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे. जिल्हा नियोजनच्या माध्यमातून चिंदर गावातील लब्देवाडी व कुंभारवाडी येथे सध्या कार्यरत असलेले ६३ केव्ही क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर बदलून त्याठिकाणी नवीन १०० केव्ही क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर मंजूर करण्यात आले आहेत. तसेच चिंदर गावठणवाडी येथेही नवीन १०० केव्ही क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर मंजूर करण्यात आला आहे.
गावात वारंवार वीजपुरवठा खंडित होणे, कमी दाबाने वीज मिळणे तसेच वाढत्या वीजभारामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. नवीन क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर मंजूर झाल्याने या समस्यांमध्ये मोठी सुधारणा होऊन चिंदर गावातील वीजपुरवठा अधिक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
काही दिवसांपूर्वी भटवाडी येथे खास यात्रेच्या पार्श्वभूमीवर १०० केव्ही क्षमतेचा नवीन ट्रान्सफॉर्मर मंजूर करून त्याची पूर्तताही करण्यात आली आहे. त्यामुळे गावातील विविध भागांतील वीजपुरवठा व्यवस्था बळकट होण्यास हातभार लागला आहे.
या कामांसाठी माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायणराव राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे तसेच भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांचे चिंदर गावाच्या वतीने विशेष आभार व्यक्त करण्यात आले आहेत.
याबाबत पंचायत समिती सदस्य दीपक सुर्वे यांनी समाधान व्यक्त करत संबंधित लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांचे विशेष आभार मानले. चिंदर गावातील वीजपुरवठा सुधारण्यासाठी करण्यात आलेल्या या प्रयत्नांमुळे ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
