देवबाग हायस्कुलचा ‘वृक्षबंधन’ उपक्रम
मालवण (प्रतिनिधी)
‘अखिल देवबाग विकास मंडळ मुंबई’ संचालित डॉ. दत्ता सामंत इंग्लिश स्कूल देवबाग या प्रशालेत आनंददायी शनिवार’ अंतर्गत शिक्षिका सौ. मेस्त्री (पाटणे) यांच्या संकल्पनेतून रक्षाबंधनाचे औचित्य साधून शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांनी मिळून ‘वृक्षबंधन’ हा उपक्रम उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमात विद्यार्थी व शिक्षक यांनी मिळून बनवलेली राखी नारळाच्या झाडाला बांधून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला.
नेहमीच्या रक्षाबंधनापेक्षा काहीतरी वेगळे आणि समाजाला संदेश देणारे करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी शाळेच्या जवळील समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या नारळाच्या झाडाला विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी मिळून स्वतः बनविलेली एक मोठी, सुंदर आणि आकर्षक राखी बांधली. या राखीच्या माध्यमातून केवळ भावाने बहिणीचे रक्षण करणेच नव्हे, तर मानवाने पर्यावरणाचे आणि वृक्षांचे रक्षण करणे किती गरजेचे आहे, हा संदेश देण्यात आला. विशेष म्हणजे ही राखी पर्यावरण पूरक वस्तूंपासून तयार करण्यात आली होती.
या अनोख्या उपक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. रचना रुपेश खोबरेकर, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. समुद्रकिनाऱ्यावरील निसर्गरम्य वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाप्रती जागरूकतेची भावना निर्माण झाली.
शाळेचे व्यवस्थापन आणि अखिल देवबाग विकास मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले असून, भविष्यातही असे पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यावर भर दिला जाईल, असे सांगितले. हा उपक्रम यशस्वी करण्याकरिता शिक्षिका सौ. मेस्त्री, सौ. गोसावी, कु. मांजरेकर, श्री. गजानन मांजरेकर यांचे विशेष मार्गदर्शन तसेच इतर सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
