Headlines

*संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त बांदा येथे अंगणवाडी सेविकांचा विशेष सत्कार…

रक्षाबंधनाने उपक्रमात भरला आपुलकीचा रंग..

⚡​बांदा ता.२९-: शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बांदा येथे संजू परब मित्र मंडळ यांच्याकडून सामाजिक बांधिलकी जपणारा एक विशेष उपक्रम पार पडला. या सोहळ्यात परिसरातील अंगणवाडी सेविकांच्या मोलाच्या सेवेचा गौरव करत त्यांना सन्मानवस्त्र देऊन सन्मानित करण्यात आले.
​लहान मुलांचे संगोपन आणि समाजाच्या आरोग्य-शिक्षणाचा पाया मजबूत करणाऱ्या अंगणवाडी सेविकांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. याच योगदानाचा सदिच्छापूर्वक आदर करण्यासाठी संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त संजू परब मित्र मंडळ यांनी हा गौरव सोहळा आयोजित केला होता. याप्रसंगी उपस्थित सर्व अंगणवाडी सेविकांना अत्यंत प्रेमाने सन्मानवस्त्र (भेटवस्तू) प्रदान करून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

​या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे अंगणवाडी सेविकांनी उपस्थितांना रेशमी धाग्याची राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. सेविकांनी व्यक्त केलेल्या या आपुलकीमुळे आणि प्रेमाच्या धाग्यामुळे संपूर्ण कार्यक्रमात स्नेहाचे व जिव्हाळ्याचे वातावरण निर्माण झाले होते. वाढदिवसाच्या शुभेच्छांसोबतच रक्षाबंधनाचा हा योग साधल्याने उपक्रमाची शोभा आणखी वाढली.

अंगणवाडी सेविकांनी या अनोख्या गौरवाबद्दल व सन्मानाबद्दल आयोजकांचे आभार मानले. अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नांसाठी व त्यांना उद्भवणाऱ्या अडी-अडचणींसाठी आम्ही सदैव त्यांच्या सोबत राहू असा विश्वास संजू परब मित्रमंडळ यांच्या वतीने देण्यात आला.

यावेळी संजु परब मित्रमंडळाचे दर्पण आळवे, ज्ञानेश्वर सावंत, गुरुनाथ सावंत, गुरु कल्याणकर, बाळू सावंत, दिपक सावंत, जावेद खतीब, प्रशांत बांदेकर, भाऊ वाळके, भैय्या गोवेकर, विनोद सावळ, तौसिफ शेख, वासुदेव उर्फ बाबा धुरी आणि श्रावणी धुरी हे उपस्थित होते.

You cannot copy content of this page