‘सिंधुजीविका’ प्रकल्पांतर्गत मुक्ताई शेती संशोधन व विकास गटाचा उपक्रम
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उपजीविका व पोषण सुरक्षेसाठी पीक विविधता, गौण वनौपज, जंगली व औषधी वनस्पतींचे लोकसहभागातून संवर्धन व व्यवस्थापन करण्याच्या उद्देशाने ‘सिंधुजीविका’ प्रकल्पांतर्गत स्थानिक बियाणे बँकेची सुरुवात करण्यात येणार आहे. मुक्ताई शेती संशोधन व विकास गटाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. स्थानिक पिकांच्या विविध जातींचे संवर्धन, त्यांचे व्यवस्थापन तसेच स्थानिक पातळीवर बियाण्यांची उपलब्धता कायम ठेवण्याच्या दृष्टीने या उपक्रमाला महत्त्व आहे. या माध्यमातून पीक विविधतेचे जतन करण्याबरोबरच शेतकऱ्यांचा स्थानिक कृषी संसाधनांशी असलेला संबंध अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
स्थानिक बियाणे बँकेचा शुभारंभ आज शनिवार दि. २९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता मुक्ताई संकुल, आर्यादुर्गा मंदिराच्या पुढे, वागदे, कणकवली येथे होणार आहे. प्रगतिशील शेतकरी संतोष गावडे व रविंद्र गावडे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचा शुभारंभ होणार असून कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत तसेच जिल्हा परिषद उपाध्यक्ष तुकाराम उर्फ दादा साईल जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा सभापती कृषी व पशुसंवर्धन जि. प. सिंधुदुर्ग हे उपस्थित राहणार आहेत.
‘सिंधुजीविका’ प्रकल्पांतर्गत स्थानिक जैवविविधतेचे संवर्धन आणि त्याच्या माध्यमातून ग्रामीण उपजीविकेला बळकटी देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रकल्प सहाय्य द एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट (TERI), नवी दिल्ली यांचे असून प्रकल्प कार्यान्वयन वायफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशन, पुणे यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
स्थानिक बियाण्यांचे संवर्धन आणि त्यांचा शेतकऱ्यांमध्ये वापर वाढविण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
