Headlines

रक्षाबंधन, पोलीस बांधवांपासून विशेष मुलांपर्यंत…!

बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी जपली माणुसकीची वीण

कुडाळ : भाऊ-बहिणीच्या प्रेम, जिव्हाळा आणि विश्वासाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल, कुडाळ येथे विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. स्काऊट आणि गाईडच्या विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या आकर्षक हस्तनिर्मित राख्या बांधून समाजसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
या उपक्रमांतर्गत प्रशालेतील स्काऊट आणि गाईड विद्यार्थ्यांनी सुंदर हस्तनिर्मित राख्या तयार केल्या होत्या. या राख्या कुडाळ पोलीस ठाण्यातील पोलीस बांधवांना बांधण्यात आल्या. देश आणि समाजाच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांप्रती विद्यार्थ्यांनी आदर, कृतज्ञता आणि शुभेच्छा व्यक्त केल्या.
यावेळी कुडाळ पोलीस निरीक्षक विकास बडवे, सहायक पोलीस निरीक्षक शेष मोरे, जयदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक गुरुदास पाडावे, अनिरुद्ध सावर्डे, सहायक पोलीस उपनिरीक्षक जनार्दन झारापकर तसेच प्रशालेच्या वतीने गाईड कॅप्टन प्राजक्ता मेस्त्री आणि सौ. मधुरा इंसूलकर उपस्थित होत्या.

झाराप येथील जीवदान विशेष शाळेतील विद्यार्थ्यांसोबतही रक्षाबंधन

रक्षाबंधनानिमित्त स्काऊट आणि गाईडच्या विद्यार्थ्यांनी झाराप येथील जीवदान विशेष शाळेलाही भेट दिली. विशेष विद्यार्थ्यांना गाईड भगिनींनी राख्या बांधून त्यांच्यासोबत रक्षाबंधनाचा आनंद साजरा केला. बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल आणि जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग यांच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा प्रशिक्षण आयुक्त क्लारा डिसोझा, सहायक जिल्हा आयुक्त-स्काऊट रोहिदास राणे, जिल्हा प्रशिक्षण आयुक्त-गाईड सौ. अंजली माहुरे, स्काऊट मास्टर सीताराम लांबर, गाईड कॅप्टन श्रद्धा कुलकर्णी, सौ. अश्विनी परब आदी उपस्थित होते.
रक्षाबंधनाच्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी प्रेम, आपुलकी, माणुसकी, कृतज्ञता आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संदेश दिला. सण केवळ उत्सव म्हणून साजरा न करता, त्यातून समाजातील विविध घटकांप्रती संवेदनशीलता आणि माणुसकी जपण्याची शिकवण विद्यार्थ्यांना मिळावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.
चेअरमन उमेश गळावणकर तसेच शाळेच्या व्यवस्थापनाच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत हा सामाजिक उपक्रम यशस्वी केला.

You cannot copy content of this page