पिठढवळ नदीतील दुर्घटना; १७ तासांच्या शोधानंतर मृतदेह सापडला..
⚡ओरोस, ता. २८ -: नारळी पौर्णिमेनिमित्त नदीत सोडलेला नारळ पकडण्याच्या प्रयत्नात पाण्यात उतरलेल्या विजय जंगले (वय ५०, सध्या रा. ओरोस-मधली परबवाडी, मूळ रा. कुंदे) यांचा पिठढवळ नदीत बुडून मृत्यू झाला. गुरुवारी (ता. २७) सायंकाळी ही दुर्घटना घडली. तब्बल १७ तासांच्या शोधमोहिमेनंतर शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास त्यांचा मृतदेह नदीपात्रातील झाडाच्या मुळाशी आढळून आला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिसांनी गुरुवारी सायंकाळपासून शोधमोहीम सुरू केली. रात्री जनरेटरच्या मदतीने प्रकाशव्यवस्था करून नदीपात्रात शोध घेण्यात आला. मात्र, अंधार आणि नदीतील परिस्थितीमुळे जंगले यांचा ठावठिकाणा लागू शकला नाही. त्यामुळे रात्री उशिरा शोधमोहीम थांबविण्यात आली.
शुक्रवारी सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आले. यासाठी मालवण येथील पाणबुडी पथकाला पाचारण करण्यात आले, तर पिंगुळी येथून बोट आणण्यात आली. पाणबुडी पथक व बोटीच्या सहाय्याने शोध घेत असताना सकाळी साडेदहाच्या सुमारास नदीपात्रातील एका झाडाच्या मुळाशी जंगले यांचा मृतदेह आढळून आला.
यावेळी सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्याचे प्रभारी शेखर लव्हे, पाणबुडी पथकाचे सदस्य तसेच स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. स्थानिक शुभम राडीवडेकर यांनीही शोधमोहिमेत सहकार्य केले.
आपत्ती व्यवस्थापनावर ग्रामस्थांचा रोष
नदीत व्यक्ती बुडाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले; मात्र प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडून आवश्यक साधनसामग्री आणि प्रशिक्षित मनुष्यबळ तातडीने उपलब्ध झाले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. त्यामुळे स्थानिकांनाच उपलब्ध साधनांच्या मदतीने शोधमोहीम राबवावी लागल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
