काँग्रेस तालुकाध्यक्ष अभय मालवणकर यांचे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन..
⚡सावंतवाडी ता.२८-: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी तालुक्यातील प्रमुख रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी तसेच साईडपट्टीवरील गवत साफ करावे, अशी मागणी सावंतवाडी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अभय घनश्याम मालवणकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.
याबाबत त्यांनी राष्ट्रीय महामार्ग सावंतवाडी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात सावंतवाडी तालुक्यातील आंबोली, दाणोली, माडखोल तसेच खुडी पूल ते सावंतवाडी या मार्गांचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे.
या मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात झाडी वाढल्याने वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या रस्त्यावर वाहतुकीची मोठी वर्दळ असून, गणेशोत्सवासाठी मुंबई, पुणे व इतर शहरांतून येणारे चाकरमानीदेखील मोठ्या प्रमाणात या मार्गाचा वापर करतात. त्यामुळे रस्ता सुरक्षित व वाहतुकीस योग्य असणे आवश्यक असल्याचे मालवणकर यांनी निवेदनात म्हटले आहे.
रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी तसेच साईडपट्टीवर वाढलेले गवत तातडीने साफ करावे. तसेच रस्त्यावरील आवश्यक दुरुस्ती करून दुचाकी व इतर वाहनचालकांना प्रवास करताना कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
गणेशोत्सवापूर्वी ही कामे तातडीने हाती घेऊन आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी विनंती सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात आली आहे.
