गणेशोत्सवापूर्वी रस्ते दुरुस्ती व गटारे साफ करा: नगरपरिषदेकडे मागणी, भारती मोरे यांनी निवेदन केले सादर..
⚡सावंतवाडी ता.२८-: शहरातील विविध भागांतील रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि गटारांच्या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन गणेशोत्सवापूर्वी आवश्यक दुरुस्तीची कामे पूर्ण करावीत, अशी मागणी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सावंतवाडी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत महिलाशर अध्यक्ष भारती मोरे यांनी निवेदन केले सादर.
शहरातील सर्व प्रमुख भागांतील
रस्ते खड्डेमय झाले असून, त्यामुळे वाहनचालक व पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे छोटे-मोठे अपघात होण्याची शक्यता असून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे रस्त्यावरील खड्डे तातडीने दर्जेदार साहित्याचा वापर करून बुजवावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच गटारे अतिवृष्टीमुळे मातीने तुडुंब भरल्याने पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसून शहरात अस्वच्छतेची समस्या निर्माण झाली आहे. शहराच्या हद्दीतील रस्त्यांच्या कडेला वाढलेली झाडी वाहतुकीस अडथळा ठरत आहे. गणेश चतुर्थी जवळ आल्याने शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्नही गंभीर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
गटारे स्वच्छ करून पाण्याचा निचरा सुरळीत करावा, रस्त्यांच्या कडेला वाढलेली झाडी हटवावी तसेच गणेशोत्सवापूर्वी शहरातील सर्व खड्डेमय रस्ते दुरुस्त करावेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
या मागण्यांबाबत तातडीने कार्यवाही करून शहरवासीयांना दिलासा द्यावा, अशी विनंती शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली
