Headlines

अंगणवाडी केंद्रांच्या कामकाजाचा सभापती अनुराधा नारकर यांनी घेतला आढावा…

⚡दोडामार्ग ता.२७-: जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या महिला व बालविकास समितीच्या सभापती श्रीमती अनुराधा नारकर यांनी गुरुवारी दोडामार्ग तालुक्याचा दौरा करून विविध अंगणवाडी केंद्रांना भेटी देत महिला व बालविकास विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला.
दौऱ्यादरम्यान उसप, घोडगेवाडी व मोरगाव येथील अंगणवाडी केंद्रांना भेट देऊन बालकांना देण्यात येणारा पोषण आहार, शैक्षणिक साहित्य, स्वच्छता, बालकांची उपस्थिती तसेच उपलब्ध मूलभूत सुविधांची पाहणी करण्यात आली.

यावेळी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्याशी संवाद साधून त्यांच्या अडचणी व प्रलंबित प्रश्नांची माहितीही घेण्यात आली.
अंगणवाडी सेविकांकडून बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध नाविन्यपूर्ण, शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्यविषयक व कौशल्यविकासात्मक उपक्रमांची माहिती नारकर यांनी घेतली. बालकांसाठी कल्पकतेने विविध उपक्रम राबविणाऱ्या सेविका व मदतनीस यांच्या कामाचे त्यांनी कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे बालकांमध्ये शिकण्याची गोडी, आत्मविश्वास आणि विविध कौशल्ये विकसित होण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले.
अंगणवाडी केंद्रांमध्ये आवश्यक असलेल्या सुविधा तसेच प्रलंबित कामांबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेत नारकर यांनी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. बालकांना चांगल्या सुविधा, दर्जेदार पोषण आहार आणि सुरक्षित वातावरण मिळावे, यासाठी संबंधित यंत्रणेने प्रभावीपणे काम करावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी पंचायत समिती दोडामार्गच्या सभापती श्रीमती पार्वती गवस, जिल्हा परिषद सदस्य श्रीमती श्वेता धरणे, श्रीमती साक्षी तळवडेकर, श्री. रामा गवस, पंचायत समिती सदस्य श्रीमती स्नेहा गवस, श्री. संजय सातार्डेकर, संबंधित कार्यक्षेत्रातील लोकप्रतिनिधी, सहाय्यक गटविकास अधिकारी श्री. यशवंत गवस तसेच बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती तारका साटम-पाटील उपस्थित होते.
या दौऱ्यामुळे अंगणवाडी केंद्रांवरील प्रत्यक्ष परिस्थितीची माहिती घेऊन आवश्यक सुधारणा व उपाययोजनांना गती मिळण्यास मदत होणार आहे.

You cannot copy content of this page