स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; वेंगुर्ला पोलिसांच्या ताब्यात..
⚡ओरोस, ता. २९-: वेंगुर्ला पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील फरार संशयिताला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गोव्यात सापळा रचून ताब्यात घेतले. धीरज दिलीप गुप्ता (वय २०, रा. गणेश नगर, कोलवले, गोवा) असे त्याचे नाव आहे.
वेंगुर्ला पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२) अन्वये मोटारसायकल चोरीचा गुन्हा (गु. र. नं. ८९/२०२६) दाखल आहे. या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून समांतर तपास सुरू होता. तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार संशयित गुप्ता हा पणजी परिसरात असल्याचे स्पष्ट झाले.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पणजी येथे सापळा रचून त्याला शिताफीने ताब्यात घेतले. वैद्यकीय तपासणीनंतर पुढील तपास व कार्यवाहीसाठी त्याला वेंगुर्ला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर व अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अनिल हाडळ, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुरेश राठोड, डॉमीनिक डिसोझा, हवालदार जॅकसन घोन्सालविस, पोलिस अंमलदार अमर कांडर, महेश्वर समजिस्कर आणि सायबर विभागाच्या धनश्री परब यांच्या पथकाने ही कारवाई केली.
