ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाची तहसीलदार श्रीधर पाटील यांच्याकडे मागणी..
⚡बांदा ता.२८-:
आंबा-काजू बागायतींचे नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाची नुकसानभरपाई गणेश चतुर्थीपूर्वी मिळावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिष्टमंडळाने सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांची भेट घेऊन केली आहे. यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या अडचणी मांडत भरपाई वितरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी शिवसेना (ठाकरे गट) सावंतवाडी विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ, सावंतवाडी तालुकाप्रमुख राजू शेटकर, उपतालुकाप्रमुख अशोक धुरी, विभागप्रमुख आबा केरकर, सुनील गावडे, पंचायत समिती सदस्य उदय पारिपत्ये, मडुरा येथील सामाजिक कार्यकर्ते नारायण परब, तसेच अनंत गावडे व गोकुळदास मोटे उपस्थित होते.
प्रतिकूल हवामान व नैसर्गिक आपत्तीमुळे आंबा आणि काजू बागायतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण झाले व शासनाने भरपाई रक्कमही जाहीर केली असून आवश्यक प्रक्रिया पार पडूनही नुकसानभरपाई अद्याप खात्यावर जमा झालेली नाही. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची नितांत गरज असून, सणापूर्वी भरपाई मिळाल्यास त्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे शिष्टमंडळाने सांगितले.
