डिजिटल शेती, शासकीय योजना आणि पीक संरक्षणाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन
वेंगुर्ला
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत कृषी महाविद्यालय, मुळदे यांच्या RHWE कार्यक्रमांतर्गत वेंगुर्ला तालुक्यातील तुळस येथे ‘शेतकरी समस्या, प्रश्न व निवारण’ या विषयावर शेतकरी गट चर्चा कार्यक्रम संपन्न झाला. या चर्चेला परिसरातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
या गट चर्चेदरम्यान विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून शेती अधिक सुलभ, आधुनिक आणि माहितीपूर्ण करण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. ‘किसान सारथी ॲप’, ‘महा विस्तार AI ॲप’, ‘फार्मर आयडी’ (Farmer ID) तसेच शासनाच्या विविध कृषी योजनांची माहिती उपस्थित शेतकऱ्यांना देण्यात आली. या योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक माहिती तसेच डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. शेतीतील विविध पिकांवर पडणाऱ्या किडी व रोग, त्यांची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय आणि पीक संरक्षणाच्या आधुनिक पद्धती यावरही सविस्तर चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांनी आपल्या शेतीशी संबंधित विविध समस्या व प्रश्न विद्यार्थ्यांसमोर मांडले. विद्यार्थ्यांनी उपलब्ध कृषी तंत्रज्ञानाच्या आधारे त्यांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून वेंगुर्ला पं. स. सभापती शंकर घारे, तुळस ग्रा.पं. सरपंच रश्मी परब, सिंधुदुर्ग भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, वेंगुर्ला उपनगराध्यक्ष सुहास गवडळकर, सदस्य जयवंत तुळसकर, माजी उपसरपंच सचिन नाईक तसेच वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळसचे अध्यक्ष डॉ. सचिन परुळकर आदी उपस्थित होते.उपस्थित मान्यवरानी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधत विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक कृषी तंत्रज्ञान आणि शासकीय योजनांची माहिती पोहोचविण्यासाठी विद्यार्थ्यांनी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असल्याचे मत व्यक्त केले.
या गट चर्चेमुळे शेतीविषयक समस्या समजून घेण्यास आणि त्यावर योग्य उपाययोजना जाणून घेण्यास मोठी मदत झाल्याची भावना उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केली. हा उपक्रम कृषी महाविद्यालय, मुळदेचे विद्यार्थी ओम कुंभार, अरिन मोंडे, धनंजय साळवी, सिद्धार्थ चौधरी, यशराज पाटील, अमित टोकसिया आणि दिनेश बिश्नोई यांनी यशस्वीरीत्या पार पाडला.
