अॅड. नीता सावंत कविटकर यांची मागणी: यांचे नगरपरिषदेला निवेदन केले सादर..
⚡सावंतवाडी ता.२७-: शहरातील ऐतिहासिक तलाव परिसरात नागरिक, पर्यटक, ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांची मोठी वर्दळ असते. तलावाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विद्यमान उपाययोजना अपुऱ्या असल्याने संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणी शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख अॅड. नीता सावंत कविटकर यांनी नगरपरिषदेकडे निवेदनाद्वारे केली.
तलावाभोवती मजबूत सुरक्षा जाळी व संरक्षक फेन्सिंग, आपत्कालीन बचावासाठी स्टीलच्या शिड्या, लाईफ बॉय, लाईफ जॅकेट व मजबूत दोरीची व्यवस्था करावी. तसेच तरंगती सुरक्षा दोरी, रेस्क्यू प्लॅटफॉर्म, धोकादायक खोल पाण्याबाबत सूचना फलक, सीसीटीव्ही कॅमेरे व पुरेशी प्रकाश व्यवस्था करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. आपत्कालीन संपर्क क्रमांक व मदत केंद्राची माहिती देणारे फलक उभारण्याबरोबरच सुरक्षा साधनांची नियमित तपासणी व देखभालीसाठी स्वतंत्र जबाबदार यंत्रणा नियुक्त करावी, अशीही मागणी करण्यात आली.
तलाव परिसरात एखादी व्यक्ती चुकून पडल्यास तातडीने बचावकार्य करता यावे आणि संभाव्य दुर्घटना टाळता याव्यात, यासाठी या उपाययोजना आवश्यक असल्याचे अॅड. सावंत यांनी निवेदनात नमूद केले.
यावेळी शहरप्रमुख श्री. बाबू उर्फ खेमराज कुडतरकर, नगरसेविका सौ. शर्वरी धारगळकर, सौ. स्नेह नाईक, सौ. सुप्रिता धारणकर, सौ. भारती परब आदी उपस्थित होते.
