Headlines

किल्ले सिंधुदुर्गवरून सागराला मानाचे श्रीफळ अर्पण…

⚡मालवण,ता.२७-:
शिवकालीन परंपरेनुसार मालवणात नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळपासून किल्ले सिंधुदुर्गवर विविध देवदेवतांची विधिवत पूजा करण्यात आली. दुपारी साडेतीनच्या सुमारास किल्ल्यावरून सागराला मानाचे श्रीफळ अर्पण करण्यात आले. यावेळी किल्ल्यावर तोफेची सलामी देण्यात आली.
दरम्यान, मालवण बाजारपेठेतील हनुमान मंदिरापासून व्यापारी बांधवांनी वाजतगाजत श्रीफळाची मिरवणूक काढून ते बंदर जेटीवर आणले. व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर यांच्या हस्ते श्रीफळाचे पूजन करण्यात आले. यावेळी आमदार निलेश राणे, माजी आमदार वैभव नाईक यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, नगरसेवक, व्यापारी, मच्छिमार, पर्यटन व्यावसायिक व नागरिक उपस्थित होते. नेरुरकर यांनी व्यापारी बांधवांच्या वतीने सागराला श्रीफळ अर्पण करून मालवणवासीयांच्या व्यवसायात बरकत मिळावी व सर्वांना सुखी ठेवावे, असे साकडे घातले.
नारळी पौर्णिमेनिमित्त बंदर जेटी परिसरात नारळ लढविण्याच्या विविध स्पर्धा रंगल्या. महिलांसाठी मालवणी संस्कृती व वारसा मंडळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी, बंड्या सरमळकर मित्रमंडळ तसेच शिंदे शिवसेना व भाजपा महायुतीच्या वतीने, तर पुरुषांसाठी सतीश आचरेकर मित्रमंडळ व रॉयल ब्रदर्स मित्रमंडळातर्फे स्पर्धा घेण्यात आल्या. युवक व बच्चेकंपनीनेही नारळ लढविण्याचा मनमुराद आनंद लुटला.
सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशनच्या मान्यतेने लायन्स क्लब मालवण, मालवण व्यापारी संघ, एकता क्रीडा मंडळ व युवा क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पुरुष व महिला गटातील कबड्डी स्पर्धाही घेण्यात आली. स्पर्धा पाहण्यासाठी क्रीडाप्रेमींनी मोठी गर्दी केली होती.
दरम्यान, मासेमारी बंदीचा कालावधी संपल्यानंतर मच्छिमार बांधवांनी परंपरेनुसार समुद्राला श्रीफळ अर्पण करून मासेमारीच्या नव्या हंगामास सुरुवात केली. आपल्या नौका सजवून मच्छिमारांनी दर्याला बरकतीसाठी साकडे घातले. “बा देवा सागरेश्वरा, धंद्यात बरकत दे,” अशी प्रार्थना करत मच्छिमारांनी नौका समुद्रात लोटल्या. नारळी पौर्णिमेनिमित्त मालवण बंदर जेटी व समुद्रकिनारा नागरिकांच्या गर्दीने फुलून गेला होता.

You cannot copy content of this page