Headlines

सावंतवाडी एसटी बसस्थानकाचे काम तातडीने सुरू करा…

गणेशोत्सवापूर्वी १५ नवीन बसेस; बेळगावमार्गे बंगळुरू आंतरराज्य बससेवा सुरू करण्याची केसरकरांची मागणी

⚡सावंतवाडी ता.२५-: सावंतवाडी मतदारसंघातील एसटी सेवेच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आमदार दीपक केसरकर यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेतली. यावेळी सावंतवाडी एसटी बसस्थानकाचे रखडलेले बांधकाम तातडीने सुरू करणे, गणेशोत्सवापूर्वी उर्वरित १५ नवीन एसटी बसेस उपलब्ध करून देणे तसेच सावंतवाडी-बेळगावमार्गे बंगळुरू अशी दैनंदिन आंतरराज्य एसटी बससेवा सुरू करण्याची आग्रही मागणी त्यांनी केली.
सावंतवाडी एसटी बस डेपोचे बांधकाम बीओटी तत्त्वावर मंजूर झाले आहे. मात्र, प्रशासनाकडून या कामाला विलंब होत असल्याने केसरकर यांनी संबंधित अधिकारी व पदाधिकाऱ्यांची तातडीने बैठक आयोजित करून बांधकामाला गती देण्याची मागणी परिवहन मंत्र्यांकडे केली.
दरम्यान, याच आठवड्यात सावंतवाडीला एसटीच्या पाच नवीन बसेस प्राप्त झाल्या आहेत. याबद्दल केसरकर यांनी मंत्री सरनाईक यांचे आभार मानले. मात्र, मंजूर असलेल्या उर्वरित १५ बसेस गणेशोत्सवापूर्वी सावंतवाडीला उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
सावंतवाडी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातून बंगळुरू आणि परिसरात शिक्षण, नोकरी, व्यवसाय तसेच अन्य कारणांसाठी मोठ्या प्रमाणात प्रवास केला जातो. सध्या या प्रवाशांना बंगळुरूला जाण्यासाठी बेळगाव किंवा पणजी-मडगावमार्गे प्रवास करावा लागत असल्याने वेळ व आर्थिक खर्च वाढतो.
त्यामुळे सावंतवाडी-बेळगावमार्गे बंगळुरू अशी दैनंदिन आंतरराज्य एसटी बससेवा सुरू केल्यास सिंधुदुर्गातील प्रवाशांसह कर्नाटकातील बंगळुरू, तुमकूर, चित्रदुर्ग, दावणगेरे, हावेरी, हुबळी, धारवाड आणि बेळगाव परिसरातील प्रवाशांनाही मोठा फायदा होणार आहे. या मार्गावर आंबोली हे महत्त्वाचे पर्यटनस्थळ असल्याने बससेवेला चांगले भारमान मिळण्याची शक्यताही केसरकर यांनी व्यक्त केली.
सावंतवाडी-बंगळुरू बससेवा सुरू झाल्यास विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक, स्थानिक नागरिक तसेच पर्यटकांची मोठी सोय होणार असल्याचे सांगत केसरकर यांनी ही सेवा तातडीने सुरू करण्याची मागणी केली. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तिन्ही मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याचे केसरकर यांनी सांगितले.

You cannot copy content of this page