Headlines

स्त्रीवाद म्हणजे पुरुषविरोध नव्हे, तर मानवतावाद…

सरिता पवार:अनुभव शिक्षा केंद्र व गोपुरी आश्रमाच्या वतीने युवाईसाठी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न:३० युवक-युवतींचा सहभाग..

कणकवली : स्त्रीवाद म्हणजे पुरुषविरोध असा काहीसा विचार समाजमनावर पसरलेला दिसतो. मात्र, स्त्रीवाद म्हणजे पुरुषविरोध नसून स्त्रीवाद म्हणजे ‘मानवतावाद’ आहे. हा विचार युवक आणि समाजाने समजून घेऊन त्याप्रमाणे आचरण करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन कवयित्री सरिता पवार यांनी केले.

अनुभव शिक्षा केंद्र आणि गोपुरी आश्रम, वागदे-कणकवली यांच्या वतीने युवाईसाठी आयोजित जिल्हास्तरीय ‘वक्तृत्व स्पर्धा-२०२६’च्या समारोपप्रसंगी त्या बोलत होत्या. युवकांना विविध सामाजिक प्रश्नांबाबत सजगता यावी, याकरिता या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी विचारमंचावर गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर, सचिव विनायक उर्फ बाळू मेस्त्री, अनुभव शिक्षा केंद्राचे जिल्हा प्रशिक्षक सहदेव पाटकर, पर्यावरण अभ्यासिका मेगल डिसोजा आदी मान्यवर उपस्थित होते.

सरिता पवार पुढे म्हणाल्या की, आपण सातत्याने ऐतिहासिक पुराव्यांच्या संदर्भावर संशोधनाची मांडणी करण्याचा प्रयत्न करतो. परंतु व्यक्तिगत पातळीवर नवीन उदाहरणांचा सुद्धा शोध घेण्याचा प्रयत्न करायला हवा. युवकांमध्ये ही सजगता येणे गरजेचे आहे.

यावेळी गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर यांनी पुढील महिन्यापासून गोपुरी आश्रमात युवकांकरिता ‘वाचन संस्कृती विकास’ हा उपक्रम सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. हा उपक्रम प्रत्येक महिन्यात एका रविवारी आयोजित करण्यात येणार आहे. युवकांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. राजेंद्र मुंबरकर यांनी केले.

गोपुरी आश्रमाचे सचिव विनायक उर्फ बाळू मेस्त्री यांनी जिल्ह्याचे पर्यावरण शाश्वत ठेवण्यासाठी पुढील काळात जिल्ह्याच्या जैवविविधतेचा सविस्तर अभ्यास केला जाणार असल्याचे सांगितले. या उपक्रमात युवा वर्गाने सहभाग घेऊन जिल्ह्याची जैवविविधता अबाधित राखण्यासाठी सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

वक्तृत्व स्पर्धेसाठी ‘कोकण का तापतंय?’, ‘महिला अत्याचार – दोष कुणाचा?’, ‘युवकांचे भविष्य – सकारात्मक बदलाची गरज’ आणि ‘आजचे राजकारण आणि युवकांची भूमिका’ हे विषय देण्यात आले होते.

या स्पर्धेत एकूण ३० युवा-युवतींनी सहभाग घेतला. यामध्ये इन्सुली येथील विठ्ठल संजय दळवी (वय २५) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. हरकुळ बुद्रुक बु.II येथील प्रतीक्षा संजय पाटील (वय १८) यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला. न्यू इंग्लिश स्कूल, ओरोस येथील अस्मि धनंजय करंगुटकर (वय १६) यांनी तृतीय क्रमांक मिळविला. शा. कृ. पंतवालावलकर कनिष्ठ महाविद्यालय, देवगड येथील आर्या सत्यवान जोईल (वय १८) हिला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.

पारितोषिकांचे प्रायोजकत्व अनुक्रमे सचिन कोरगावकर, गोपुरी आश्रम व ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्त्या कमलताई परुळेकर यांनी स्वीकारले होते.

या स्पर्धेवेळी आंतरराष्ट्रीय पातळीवरील शरीरसौष्ठव स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या अमित कदम, तसेच साथी मेगल डिसोझा, तन्मय पंडित, राहुल जाधव, रोहित जाधव या युवकांचा सन्मान करण्यात आला.

ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गोपुरी आश्रमाचे सचिव बाळू मेस्त्री, खजिनदार विनायक सापळे, सहसचिव संदीप सावंत, अनुभव शिक्षा केंद्राचे जिल्हा प्रशिक्षक सहदेव पाटकर यांच्यासहित यज्ञेश पोकळे, सुदीप दिगवळेकर, राहुल कांबळे, श्रुती पाटणकर, बुशरा बागवान, सिद्धी परब, महेश जाधव, विद्देश बाईत, वनश्री जाधव व दुर्गेश पवार यांनी विशेष मेहनत घेतली.

You cannot copy content of this page