दोन वर्षांच्या पाठपुराव्याला यश; काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या मागणीची एसटी महामंडळाकडून दखल..
⚡सावंतवाडी ता.२५-: सावंतवाडी-बांदा-डेगवे-असनिये-घारपी मार्गावरील एसटी बससेवा अखेर सुरू करण्यात आली आहे. तालुका काँग्रेस उपाध्यक्ष भाऊसाहेब देसाई व जिल्हा काँग्रेस सरचिटणीस केतनकुमार गावडे यांनी २०२४ मध्ये या मार्गावर बससेवा सुरू करण्यासाठी सावंतवाडी आगारप्रमुखांकडे निवेदन दिले होते. त्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता.
सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच वनविभागाच्या आवश्यक परवानग्यांची प्रक्रिया पूर्ण करून प्रस्ताव कणकवली येथील संबंधित कार्यालयाकडे पाठविण्यात आला होता. अखेर दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर या मार्गावर एसटी बससेवा सुरू झाली आहे.
मंगळवारी (दि. २५ ऑगस्ट) बांदा एसटी बसस्थानक तसेच डेगवे ग्रामपंचायत येथे या बससेवेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी तालुका काँग्रेस उपाध्यक्ष भाऊसाहेब देसाई, जिल्हा काँग्रेस सरचिटणीस रवींद्र म्हापसेकर, जिल्हा काँग्रेस सरचिटणीस केतनकुमार गावडे तसेच डेगवे व तांबोळी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
या बससेवेसाठी डेगवेचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते आणि ज्येष्ठ नागरिकांनी केलेल्या सहकार्यामुळे हा प्रश्न मार्गी लागल्याचे भाऊसाहेब देसाई यांनी सांगितले. एसटी महामंडळासह सहकार्य करणारे जिल्हा व तालुका काँग्रेस पदाधिकारी तसेच डेगवे ग्रामस्थांचे त्यांनी आभार मानले.
या उपक्रमासाठी डेगवेचे माजी सरपंच मंगलदास देसाई व ग्रामपंचायत सदस्य विजय देसाई यांचेही सहकार्य लाभले. बससेवा सुरू झाल्यामुळे डेगवे, असनिये, घारपी परिसरातील ग्रामस्थांची वाहतूक सुविधा अधिक सुलभ होणार असून, विद्यार्थी, नोकरदार आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
