Headlines

धामणस्करांना काव्यातून श्रद्धांजली

‘आम्ही साहित्यप्रेमी’च्या ‘श्रावणधारा’ कविसंमेलनात १५ कवींचा सहभाग..

⚡ओरोस, ता. २५ -: ज्येष्ठ कवी द. भा. धामणस्कर यांच्या निधनाने शब्दांचे मर्म जाणणाऱ्या संवेदनशील आणि ऋजू व्यक्तिमत्त्वाच्या कवीला मराठी काव्यविश्व मुकले आहे, अशा शब्दांत ‘आम्ही साहित्यप्रेमी’च्या कविसंमेलनात त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. धामणस्कर यांना समर्पित या कविसंमेलनात १५ कवींनी विविध विषयांवरील कविता सादर केल्या. त्याला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
‘घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग’ प्रणित ‘आम्ही साहित्यप्रेमी’ व्यासपीठाच्या अठराव्या मासिक कार्यक्रमानिमित्त सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे ‘श्रावणधारा’ कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते. व्यासपीठावर उपक्रमाचे समन्वयक सतीश लळीत, ज्येष्ठ कवयित्री संध्या तांबे आणि कवी सुरेश पवार उपस्थित होते.
लळीत यांनी धामणस्कर यांच्या साहित्यिक प्रवासाचा आढावा घेतला. अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र विषयांत पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या धामणस्कर यांनी उपजीविकेसाठी रिझर्व्ह बँकेत नोकरी केली; मात्र कविता हीच त्यांची खरी जीविका होती. वयाच्या सतराव्या वर्षी त्यांनी पहिली कविता लिहिली. अल्पावधीतच त्यांच्या कवितांना ‘सत्यकथा’, ‘मौज’, ‘कविता-रती’ यांसारख्या दर्जेदार वाङ्मयीन नियतकालिकांत स्थान मिळाले. धामणस्कर यांनी मोजके; पण समृद्ध काव्यलेखन केले. ‘प्राक्तनाचे संदर्भ’, ‘बरेच काही उगवून आलेले’ आणि ‘भरून आलेले आकाश’ या त्यांच्या काव्यसंग्रहांना रसिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. त्यांचे निधन हा मराठी साहित्य विश्वासाठी मोठा धक्का असल्याचे लळीत यांनी सांगितले.
धामणस्कर यांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर कविसंमेलनाला सुरुवात झाली. संध्या तांबे, डॉ. सई लळीत, सुरेश पवार, पुरुषोत्तम लाडू कदम, सुधीर गोठणकर, मधुकर जाधव, नम्रता रासम, प्रगती पाताडे, मनोहर सरमळकर, मिताली मुळिक, मनीषा पाताडे, सीमा मसुरेकर, सुस्मिता राणे, आर्या बागवे आणि अपर्णा जोशी यांनी कविता सादर केल्या. कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्या प्रिया आजगावकर, डॉ. संदीप नाटेकर, डॉ. प्रतिमा नाटेकर, विष्णुप्रसाद दळवी यांच्यासह साहित्यरसिक उपस्थित होते. सर्वच कवितांना उपस्थितांकडून दाद मिळाली.

फोटो ओळ:- सिंधुदुर्गनगरी:

You cannot copy content of this page