⚡ओरोस, ता. २५-: ओरोस येथील सिद्धी ऑटोमोबाईल पेट्रोलपंपावरून ५७ हजार रुपयांची रोकड चोरल्याच्या आरोपातून पाचही आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. सरकारी पक्षाला आरोपींचा गुन्ह्यातील प्रत्यक्ष सहभाग तसेच चोरीचा आरोप ठोस व विश्वासार्ह पुराव्यांद्वारे सिद्ध करता आला नसल्याचे नमूद करत अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी स्वाती जे. पाटील यांनी हा निकाल दिला.
या प्रकरणी अब्दुल रज्जाक अब्दुल हमीद खान, मीर बादशाह शेख, प्रमोद प्रकाश गायकवाड, सोहेल युनुस काझी आणि राजेश गुणाजी मासवकर यांच्याविरोधात सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने २४ ऑगस्टला या पाचही जणांची निर्दोष मुक्तता केली.
पोलिसांकडील फिर्यादीनुसार, १ जानेवारी २०२२ रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास ओरोस येथील सिद्धी ऑटोमोबाईल पेट्रोलपंपावर ही घटना घडली होती. पेट्रोलपंपावरील प्लास्टिक बॉक्समध्ये ठेवलेली ५७ हजार रुपयांची रोकड चोरून आरोपी कारमधून पळून गेल्याचा आरोप होता. याप्रकरणी सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ३७९ आणि ३४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.
या खटल्यात सरकारी पक्षाने फिर्यादीसह आठ साक्षीदारांची साक्ष न्यायालयासमोर नोंदविली. मात्र, कथित गुन्ह्यात आरोपींचा प्रत्यक्ष सहभाग तसेच चोरीचा आरोप संशयातीतरीत्या सिद्ध करणारा ठोस व विश्वासार्ह पुरावा सादर करण्यात सरकारी पक्षाला यश आले नाही.
आरोपींच्या वतीने ॲड. अशपाक शेख यांनी युक्तिवाद केला. सरकारी पक्षाचा पुरावा आरोपींवरील आरोप सिद्ध करण्यास अपुरा आणि विसंगत असल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद, साक्षी आणि उपलब्ध पुराव्यांचा विचार करून न्यायालयाने पाचही आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याचा आदेश दिला. या प्रकरणात ॲड. नामदेव मठकर, ॲड. पंकज खरवडे, ॲड. विनय राजपूत, ॲड कैस शेख, ॲड. भूषण कदम, ॲड. असीम मुजावर आणि ॲड. हरेश वरावडेकर यांनी सहकार्य केले.
पेट्रोलपंप चोरीप्रकरणी पाच निर्दोष…
