Headlines

बांदा पंचक्रोशीतील वीज समस्या सोडविण्यासाठी महावितरणला वूड कटर..

जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांची महावितरण कार्यालयाला भेट; वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी उपाययोजनांवर चर्चा..

⚡बांदा ता.२०-: सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत यांनी आज सकाळी महावितरणच्या बांदा कार्यालयाला सदिच्छा भेट देत बांदा पंचक्रोशीतील वीजपुरवठ्याच्या विविध समस्यांची माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांनी सहाय्यक अभियंता वैष्णव कांबळे व कर्मचाऱ्यांशी संवाद साधून वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत चर्चा केली.
बांदा पंचक्रोशीतील गावांमध्ये वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, वीजवाहिन्यांवरील देखभाल-दुरुस्तीची कामे, तांत्रिक बिघाड तसेच पावसाळ्यात उद्भवणाऱ्या विविध समस्या याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. नागरिकांना वीजपुरवठ्यामुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली.
दरम्यान, बांदा-१ व बांदा-२ महावितरण कार्यालयासाठी प्रत्येकी एक वूड कटर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. वीजवाहिन्यांवर झाडांच्या फांद्या पडणे किंवा झाडांमुळे वीजपुरवठ्यात अडथळे निर्माण होणे अशा परिस्थितीत हे यंत्र अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे तांत्रिक कर्मचाऱ्यांना अडथळे दूर करून वीजपुरवठा पूर्ववत करण्यास अधिक वेगाने कार्यवाही करता येणार आहे.
यावेळी महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बांदा पंचक्रोशीतील वीजपुरवठ्याच्या परिस्थितीची माहिती दिली. नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबतही चर्चा झाली.
बांदा पंचक्रोशीतील वीज समस्या जाणून घेण्यासाठी तसेच महावितरणच्या दोन्ही कार्यालयांना आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून दिल्याबद्दल जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांचे महावितरण अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मनापासून आभार व्यक्त केले.

You cannot copy content of this page