Headlines

इन्सुली महामार्गावरील खड्डे अखेर बुजविले..

जि.प. सदस्य नितीन राऊळ यांच्या पाठपुराव्याला यश; कोठावळेबांध, माडभाकर व डोबवाडीतील रस्त्याची दुरुस्ती सुरू..

⚡बांदा ता.२०-: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील इन्सुली परिसरातील कोठावळेबांध, माडभाकर व डोबवाडी भागात पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांच्या दुरुस्तीच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ यांनी ग्रामस्थांच्या तक्रारीची तत्काळ दखल घेत संबंधित महामार्ग विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केल्याने हे काम सुरू झाले आहे.
इन्सुली परिसरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. विशेषतः पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने त्यांचा अंदाज येत नसल्याने अपघाताची शक्यताही निर्माण झाली होती. याबाबत ग्रामस्थांनी राऊळ यांना प्रत्यक्ष घटनास्थळी बोलावून रस्त्याची गंभीर समस्या निदर्शनास आणून दिली होती.
यानंतर श्री राऊळ यांनी संबंधित महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून खड्ड्यांसह गटाराची समस्याही तातडीने सोडविण्याची मागणी केली होती. कामाला विलंब झाल्यास उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला होता.
या पाठपुराव्याची दखल घेत महामार्ग विभागाने अखेर खड्डे बुजविण्याच्या व रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली. त्यामुळे इन्सुली परिसरातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. कामाला सुरुवात केल्याबद्दल राऊळ यांनी महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले. मात्र, रस्त्याची दुरुस्ती केवळ तात्पुरती न करता दर्जेदार व टिकाऊ पद्धतीने करण्यात यावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
ग्रामस्थांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवून त्यांचा सातत्याने पाठपुरावा केल्यास प्रश्न मार्गी लागू शकतात, याचे हे उदाहरण असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली.
फोटो:-
इन्सुली येथे महामार्गवरील खड्डे आज बुजविण्यात आले.

You cannot copy content of this page