सुनील राऊळ:संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त कुणकेरी विद्यालयात पर्यावरण संवर्धन व करिअर मार्गदर्शन; विद्यार्थ्यांना १०० सुपारी रोपांचे वाटप..
⚡सावंतवाडी, ता. २०-: विद्यार्थ्यांनी स्वतःला कधीही कमजोर समजू नये. आपल्यामध्ये काहीतरी करण्याची जिद्द आहे, असा आत्मविश्वास बाळगून दहावी-बारावीच्या काळातच भविष्यात काय करायचे, याचा संकल्प करावा. ध्येय निश्चित करून त्या दिशेने सातत्याने वाटचाल केल्यास विद्यार्थी भविष्यात यशाचे शिलेदार बनतील, असे प्रतिपादन सह्याद्री फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनील राऊळ यांनी केले.
शिवसेना जिल्हाप्रमुख तथा सह्याद्री फाउंडेशनचे माजी अध्यक्ष संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त सह्याद्री फाउंडेशनच्या वतीने माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांसाठी वृक्षसंवर्धन, पर्यावरण बचाव आणि करिअर मार्गदर्शनाचा उपक्रम १९ व २० ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला. या उपक्रमांतर्गत कुणकेरी येथील आचार्य विनोबा भावे माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना १०० सुपारीच्या रोपांचे वाटप करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांना वृक्षसंवर्धन व पर्यावरण रक्षणाचे महत्त्व सांगतानाच करिअरबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामीण भागाशी नाळ जोडलेले आणि सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेले संजू परब यांनी समाजकार्य, दातृत्व, संघर्ष व मेहनतीच्या जोरावर राजकीय क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या कार्यातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी, असे राऊळ यांनी सांगितले.
दहावी-बारावीमध्ये असतानाच भविष्यात कोणत्या क्षेत्रात जायचे, हे विद्यार्थ्यांनी निश्चित करावे. आज विविध क्षेत्रांत यशस्वी झालेल्या व्यक्तींनीही आपल्या विद्यार्थी जीवनात ध्येय निश्चित करून जिद्द व चिकाटीने त्याचा पाठपुरावा केला. विद्यार्थ्यांनीही हाच आदर्श ठेवून शिक्षण घेतले पाहिजे, असे राऊळ यांनी स्पष्ट केले.
कुणकेरी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब तसेच सह्याद्री फाउंडेशनच्या माध्यमातून निश्चितपणे सहकार्य केले जाईल. तसेच ‘टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू’ या प्रशिक्षण वर्गासाठीही सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही राऊळ यांनी दिली.
यावेळी ॲड. संतोष सावंत यांनी संजू परब यांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलू विद्यार्थ्यांसमोर मांडत त्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास माजी सभापती प्रमोद सावंत, सरपंच सोनिया सावंत, सह्याद्री फाउंडेशनचे माजी सचिव ॲड. संतोष सावंत, माजी अध्यक्ष प्रल्हाद तावडे, माजी सचिव सुहास सावंत, पालक-शिक्षक समितीचे अध्यक्ष राजन मडवळ, मुख्याध्यापिका अर्चना सावंत, शिक्षक प्रताप गाडगीळ, दीप्ती सावंत, अनिल परब, राजन गोसावी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका अर्चना सावंत यांनी केले. सूत्रसंचालन विद्यार्थिनी शमिका कदम हिने केले, तर आभार प्रताप गाडगीळ यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
