Headlines

कणकवलीतील मोकाट गुरे, भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त होणार…

कणकवली : शहरातील मोकाट गुरे आणि भटक्या कुत्र्यांचा नागरिकांना होणारा उपद्रव लक्षात घेता कणकवली नगरपंचायतीने या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाचे काम सुरू असून, लवकरच कुत्रे पकडून त्यांचे निर्बीजीकरण करण्याची मोहीम व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी दिली.

कणकवली येथील गोपुरी आश्रम येथे गोपुरी आश्रमच्या पदाधिकाऱ्यांची नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी भेट घेतली. यावेळी नगरसेवक रुपेश नार्वेकर, लुकेश कांबळे, जयेश धुमाळे, गोपुरी आश्रमचे अध्यक्ष राजेंद्र मुंबरकर, सचिव बाळू मेस्त्री, खजिनदार विनायक सापळे, तेजस राणे, रामदास मांजरेकर आदी उपस्थित होते.

बैठकी दरम्यान कोंडवाड्यासाठी लागणाऱ्या जागेची पहाणी नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत केली.

पुढे ते म्हणाले, मोकाट गुरांमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असून, या गुरांचा बंदोबस्त करण्यासाठी कोंडवाडा उभारण्याचा प्रस्ताव नगरपंचायतीसमोर आहे. तसेच भटक्या कुत्र्यांसाठी स्वतंत्र शेल्टर उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी गोपुरी आश्रम परिसरात जागा उपलब्ध करून देण्याबाबत नगरपंचायतीने आश्रम व्यवस्थापनाशी चर्चा केली आहे. गोपुरी आश्रमचे अध्यक्ष राजेंद्र मुंबरकर, सचिव बाळू मेस्त्री, खजिनदार विनायक सापळे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी या उपक्रमासाठी सकारात्मक प्रतिसाद देत जागा उपलब्ध करून देण्यास संमती दर्शविली आहे. गोपुरी आश्रम परिसरात दोन जागा दाखविण्यात आल्या असून, त्यापैकी योग्य जागेवर मोकाट गुरांसाठी कोंडवाडा आणि भटक्या कुत्र्यांसाठी शेल्टर उभारण्याचे नियोजन आहे.

याबाबत नगरपंचायतीकडून लवकरच गोपुरी आश्रम व्यवस्थापनाशी अधिकृत पत्रव्यवहार करण्यात येईल. येणाऱ्या नगरपंचायत सभेच्या विषयपत्रिकेतही हा विषय ठेवण्यात आला असून, कोंडवाडा व शेल्टर कशा पद्धतीने चालवायचे, आवश्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती कशी करायची तसेच मोकाट गुरे सोडणाऱ्या संबंधितांवर दंडात्मक कारवाई कशी करायची, याबाबत चर्चा केली जाणार आहे. कणकवली शहरातील नागरिकांना मोकाट गुरे आणि भटक्या कुत्र्यांच्या त्रासापासून मुक्त करण्यासाठी ही कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचा प्रयत्न आहे, असे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी सांगितले.

लवकरच याबाबत ठराव, अंदाजपत्रक आणि निविदा प्रक्रिया पूर्ण करून कोंडवाडा तसेच कुत्र्यांसाठी शेल्टर उभारण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष पारकर यांनी स्पष्ट केले.

You cannot copy content of this page