उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांची प्रसिद्धी पत्रकाद्वारे टीका
*💫मालवण दि.०२-:* जिल्ह्यात इतर नगरपालिकेच्या नगराध्यक्षानी स्व: खर्चाने तसेच नगरपालिका निधीतून कोविड सेंटर यापूर्वीच सुरू केली असून मालवणचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर कॉपी करण्याची सवय असल्याने त्यांना आता जाग येऊन कोविड सेंटर उभारणीचे फोटोसेशन करून अगोदरच सेंटर उभारले असे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. नगराध्यक्ष कांदळगावकर यांच्या हेकेखोर स्वभावामुळे, अहंकारामुळे व नियोजनशून्य कारभारामुळेच शहराची वाईट अवस्था होत चालली असल्याची टीका उपनगरध्यक्ष राजन वराडकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे करत त्यामुळेच कोविड सेंटर उभारण्याबाबत आम्ही पत्र देऊन मागणी केली, यात आमचे काय चुकले ? आणि कार्यालयात दिलेले पत्र नगराध्यक्षांपर्यंत पोहचत नाही, ही शोकांतिका नव्हे का ? असा सवाल उपस्थित केला आहे. उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, नगराध्यक्ष कांदळगावकर यांनी उल्लेख केलेले ५० बेडचे विलगीकरण सेंटर आपल्या स्व:खर्चातून की नगरपालिकेच्या पैशातून केले हे सांगावे. जर स्व:खर्चातून केले असेल तर आम्ही त्यांचे अभिनंदनच करतो. परंतु नगरपालिकेच्या म्हणजेच जनतेच्या पैशातून करत असाल तर नगरपालिकेचे विश्वस्त असलेल्या इतर नगरसेवकांना विश्वासात घ्यावे असे वाटल नाही का ? इतर नगरसेवकही आपल्या सारखेच जनतेने निवडून दिलेले आहेत. आणि ते आपल्या प्रभागात पर्यायाने शहराच प्रतिनिधीत्व करतात. काम नगरपालिकेच्या पैशातून करायची आणि एकाच नगरसेवकाला सोबत घेऊन जास्त फोटोसेशन करायच हेच आतापर्यत कांदळगावकर यांनी केले आणि म्हणूनच आज शहराची ही परिस्थिती झाली आहे, अशी टीका वराडकर यांनी केली आहे. कोविड सेंटरच्या नियोजनाबाबत नगराध्यक्ष यांनी नगरसेवकांशी किती वेळा चर्चा केली ते पण जाहीर करावे. दोन महिन्यापूर्वी झालेल्या नगरपालिकेच्या ऑनलाईन विशेष सभेत माझे सहकारी श्री. गणेश कुशे यांनी याबाबत मागणी केली होती आणि मी त्याला अनुमोदन दिले होते. परंतु त्याच श्रेय आम्हाला मिळेल. एवढ्या एका भितीपोटी नगराध्यक्षनी हे कोव्हीड केअर सेंटर त्यावेळी सुरु करणे टाळले. जी गोष्ट आपण आज करुन शकता ती दोन महिन्यापूर्वीही करु शकत होता. परंतु शहरवासियांच्या आरोग्यापेक्षा नगराध्यक्षाना अहंम पणा जास्त महत्वाचा वाटला. कोव्हीड सेंटर जर दोन महिन्यापूर्वीच शहरात सुरु झाल असत तर कदाचित अनेकांचे प्राण आपण वाचू शकलो असतो, पण त्यावेळी नगराध्यक्षांचा मीपणा आडवा आला. नगराध्यक्षना शहरातील नागरीकांच्या आरोग्याची खरोखरच काळजी असती तर यापूर्वीच हे सेंटर उभे केले असते, असेही वराडकर यांनी म्हटले आहे. शहराला किमान १०० बेडच्या कोव्हीड केअर सेंटरची आवश्यकता असताना त्यासाठी तरतुद करण्यासाठी आपल्याकडे पैसे नाहीत आणि दुसरीकडे गटार साफसफाईसाठी रक्कम रु.२० लाख, नगरपालिकेच्या दारातील उदयान सुशोभिकरणासाठी रक्कम रु. ६३ लाख रुपये आणि इतर अनावश्यक कामांसाठी रक्कम रु.२ कोटी खर्च करु शकता; पण १०० बेडच्या कोव्हीड सेंटर उभ करु शकत नाही यातून मालवणच्या जनतेच्या आरोग्याविषयी आपण किती गंभीर आहात हे दिसून येते. प्राधान्य कोणत्या गोष्टीला द्यायचे हेच माहिती नसेल तर २४ वर्षे प्रशासकीय सेवेत राहून आपण काय करत होतात ? असा सवालही वराडकर यांनी नगराध्यक्ष कांदळगावकर यांना विचारला आहे.
