Headlines

आषाढी एकादशीच्या निमित्ताने जिल्हा परिषद घारपी शाळेत आनंदवारी ठरली लक्षवेधी

वारीतून विद्यार्थ्यांनी दिला ‘झाडे लावा, झाडे जगवा’ पर्यावरण संवर्धनाचा संदेश; ग्रामस्थांकडून चिमुकल्यांवर बक्षीसांचा वर्षाव

बांदा (दि.२५/०७/२०२६)आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारपी येथे आयोजित करण्यात आलेली विद्यार्थ्यांची आनंदवारी मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडली. विठ्ठल-रुक्मिणी , विविध संतांची व वारकऱ्यांची आकर्षक वेशभूषा परिधान करून विद्यार्थ्यांनी पारंपरिक दिंडीत सहभाग घेतला. यावेळी स्वप्नील संजय गावडे याने विठ्ठलाची तर सौम्या सागर गावडे हिने रूक्मिणीची केलेली वेशभूषा लक्षवेधी ठरली.
टाळ-मृदुंगाच्या गजरात, अभंग आणि विठ्ठलनामाच्या जयघोषात संपूर्ण गाव भक्तिरसात न्हाऊन निघाले.
यावेळी विद्यार्थ्यांनी केवळ भक्तीचा संदेशच नव्हे, तर “झाडे लावा, झाडे जगवा” हा पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश देत ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले विठ्ठलभक्तीबरोबरच पर्यावरण संरक्षणाची जाणीव निर्माण करणारी ही आगळीवेगळी आनंदवारी सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली.
‌शाळेपासून सुरू झालेली ही आनंदवारी गावातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत असताना ग्रामस्थांनी चिमुकल्या वारकऱ्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. त्यांच्या निरागस भक्तीभावाने आणि पर्यावरण जनजागृतीच्या संदेशाने भारावून गेलेल्या ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक करत त्यांना खाऊ तसेच बक्षिस स्वरूपात रोख रक्कम देऊन प्रोत्साहन दिले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना वारकरी परंपरेची ओळख, संतांच्या विचारांचे संस्कार आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजले. अध्यात्म, संस्कार, सामाजिक बांधिलकी आणि निसर्गप्रेम यांचा सुंदर संगम या आनंदवारीत अनुभवायला मिळाला.
क्षकार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी मुख्याध्यापक श्री. जे. डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारी शिक्षक आशिष तांदुळे व धर्मराज खंडागळे यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र गावकर, उपाध्यक्षा यशोदा गावडे, ग्रामपंचायत सदस्य आनंद गावडे, शिक्षणप्रेमी विजय गावकर, पोलिस पाटील समृद्धी गावडे, अंगणवाडी सेविका संजना गावकर, मदतनीस अमृता कविटकर व संचिता सावंत यांच्यासह पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आनंदवारीनंतर उपस्थित ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले. ग्रामस्थांच्या या प्रेमळ प्रतिसादामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित झाला. भक्ती, संस्कार आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणारी ही आनंदवारी घारपी गावासाठी संस्मरणीय ठरली.

You cannot copy content of this page