४०० ते ५०० किलो मांस जप्त, चालक ताब्यात..
⚡सावंतवाडी, ता. १०-: मुंबई-गोवा महामार्गावरील झाराप ते पत्रादेवी बायपास मार्गावरील फोजदारवाडी येथे गोमांससदृश मांसाची वाहतूक करणारी एक इर्टिगा कार दुभाजकाला धडकून उलटल्याची घटना शुक्रवारी (दि. १०) सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातानंतर घटनास्थळावरून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या चालकाला स्थानिक नागरिक आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
अपघातानंतर कारची तपासणी करण्यात आली असता, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गोमांससदृश मांस आढळून आले. पोलिसांनी कारमधून अंदाजे ४०० ते ५०० किलो मांस जप्त केले असून ते पुढील तपासासाठी ताब्यात घेतले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. जप्त करण्यात आलेल्या मांसाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्याची प्रक्रिया सुरू असून, ते नेमके कोणत्या प्राण्याचे मांस आहे, याबाबत अधिकृत अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.
या प्रकरणी संबंधित चालकाला ताब्यात घेण्यात आले असून, मांसाची वाहतूक कुठून होत होती आणि ते कुठे नेले जात होते, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती.
