पाईपलाईन खोदाईचे काम धोकादायक
*💫बांदा दि.३१-:* मडुरा-सातोसे रस्त्याच्या बाजूने पाईपलाईनसाठी खोदाई केली आहे. समोरून येणाऱ्या वाहनास बाजू देताना सातोसेच्या दिशेने जाणारा डंपर मडुरा माऊली मंदिराजवळ रुतला. प्रसंगवधान राखून चालकाने आपला जीव वाचवला. परंतु धोका मात्र कायम असल्याने अशा धोकादायक कामास जबाबदार कोण असा सवाल भाजपा सावंतवाडी कार्यकारिणी सदस्य तथा ग्रामस्थ बाळु गावडे यांनी केला आहे. तसेच सदर ठिकाणी खडीकरण न केल्यास अपघात रोखण्यासाठी वेळप्रसंगी आंदोलन छेडण्याचा इशाराही श्री.गावडे यांनी दिला. दुसऱ्यांदा डंपर रुतण्याची घटना घडूनही निद्रिस्त अधिकाऱ्यांना जाग येत नाही. त्यामुळे भविष्यात रस्त्याला खेटून खोदाई करण्यात आलेल्या पाईपलाईनच्या चरामुळे अपघात झाल्यास सर्वस्वी जबाबदारी संबंधित कंपनीची राहणार असल्याचे ग्रामस्थ प्रवीण उर्फ पिंट्या परब यांनी सांगितले. तर मडुरा ते सातोसे दरम्यान केलेले धोकादायक खोदाईचे काम खडी टाकून तात्काळ निर्धोक करावे अन्यथा अपघात टाळण्यासाठी ग्रामस्थ व वाहनचालकांना सोबत घेऊन आंदोलन छेडणार असल्याचे बाळू गावडे यांनी सांगितले. उशीरापर्यंत डंपर बाहेर काढण्याचे काम सुरू होते.
